कामगारांना कोरोना चाचणीची सक्ती, लोणी काळभोर आरोग्य केंद्रात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:09 AM2021-04-13T04:09:20+5:302021-04-13T04:09:20+5:30
रविवारची सुट्टी असल्याने सोमवारी (१२ एप्रिल) सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र उघडताच केस पेपर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणांवर नागरिकांची गर्दी झाली ...
रविवारची सुट्टी असल्याने सोमवारी (१२ एप्रिल) सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र उघडताच केस पेपर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणांवर नागरिकांची गर्दी झाली होती. ९ वाजण्याच्या सुमारास रांग थेट आठवडे बाजारासमोर असलेल्या म्हसोबा मंदिरापर्यंत गेली. रूग्णांना उन्हाच्या झळांचा त्रास होतो आहे हे लक्षात येताच ग्रामपंचायत प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेले संत निरंकारी भवन उघडले. आरोग्य प्रशासनाने केसपेपर काढणे तसेेेच कोरोना तपासणी करण्याची व्यवस्था सदर ठिकाणी केली त्यामुळे नागरिकांची उन्हाच्या
त्रासापासून सुटका झाली.
कोरोना बाधितांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत आहे लक्षात येताच शासनाने दिलेल्या आदेशानुसार कारखाने व छोट्या-मोठ्या वर्कशॉप व्यवस्थापनाने कामगारांना कोरोना चाचणी करून लस घेण्याची सक्ती केल्याने आज ही गर्दी झाली होती.
विशेष म्हणजे या गर्दीमध्ये पुणे शहरालगतच्या उपनगरातील नागरिकांचा समावेश होता. याचबरोबर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळत असल्याने तसेच याव्यतिरिक्त इतर आजारांवर औषधोपचार घेण्यासाठी आलेल्यांमुळेही या गर्दीत आणखी वाढ झाली होती. असे असले तरीही आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव, डॉ. रूपाली भंगाळे व सर्व आरोग्य कर्मचारी कंटाळा न करता सर्वांची तपासणी करून लस व औषधोपचार देताना दिसत होते. वाढत्या लोकसंख्येला प्राथमिक आरोग्य केेंद्राची इमारत कमी पडत आहे. त्यामुळे या इमारतीच्या वर आणखी एक मजला उभारणे गरजेचे असल्याचे मत येथे उपचारासाठी आलेल्या काही जणांनी व्यक्त केले.