कामगार झाले रुग्ण!!!; येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात मुन्नाभाई एमबीबीएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 04:45 PM2017-12-08T16:45:05+5:302017-12-08T16:48:13+5:30
येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात खोटे उपचार करुन घेतल्या प्रकरणी रुग्णालयात मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात खोटे उपचार करुन घेतल्या प्रकरणी रुग्णालयात मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजमधील जवळपास १५० कामगार येथे उपचार घेत असल्याची माहिती एमआयएमच्या स्थानिक नगरसेविका अश्विनी लांडगे यांना मिळाली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह येथे पाहणी केली असता रुग्णालयात १५० कर्मचाऱ्यांना सलाईन लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. कामगारांना काहीही झाले नसताना अशाप्रकारे पालिका प्रशासनाची फसवणूक होत असल्याबद्दल त्यांनी येरवडा पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला आहे. सकाळी दहाच्या दरम्यान हा प्रकार झाला आहे. कामगारांकडे या विषयी विचारणा केली असता त्यांना कशासाठी येथे आणले आहे, हे देखील माहित नव्हते.
डी. वाय. पाटील दंतवैद्यकीय महाविद्यालय आणि महापालिका यांच्यात ५ वर्षांचा करार झाला होता. मात्र मेडिकल कौन्सिलची मान्यता मिळविण्यासाठी डी. वाय. पाटील दंतमहाविद्यालयाचा आटापिटा सुरू असल्याचा प्रकार लांगडे यांनी उघड केला आहे.
दरम्यान खासगी संस्थांना रुग्णालये चालविण्यास देताना पारदर्शकता असावयास हवी, अशी भूमिका उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी या पूर्वीच मांडली होती.