गणरायाच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची धांदल
By admin | Published: August 25, 2015 04:56 AM2015-08-25T04:56:29+5:302015-08-25T04:56:29+5:30
अवघ्या २५ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणरायाच्या स्वागतासाठी ढोल-ताशापथकांचा सराव अगोदरच सुरू झाला आहे. मंडपाची बांधणी, देखावाचा विषय, मूर्तीची रंगरंगोटी, वेगवेगळे
- मिलिंद कांबळे, पिंपरी
अवघ्या २५ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणरायाच्या स्वागतासाठी ढोल-ताशापथकांचा सराव अगोदरच सुरू झाला आहे. मंडपाची बांधणी, देखावाचा विषय, मूर्तीची रंगरंगोटी, वेगवेगळे परवाने आदीसाठी कार्यकर्त्यांची धांदल सुरू झाली आहे. नूतन अध्यक्षांची निवड पूर्ण झाली असून, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कामकाजाची विभागणी केली आहे.
गणेशाचे पुढील महिन्यात १७ तारखेला आगमन होत आहे. त्यांच्या गणेश मंडळाचे कार्यकर्ते सरसावले आहेत. यापूर्वीच ढोल-ताशापथकांचा सराव सुरू झाला आहे. संध्याकाळनंतर जागोजागी ढोल- ताशाचा दणदणाट कानी पडत आहे. रस्त्यांवर, नदीकाठी, शाळेच्या मैदानात, पटांगणात वादनाचा सराव सुरू आहे. पावसाचा अडथळा होऊ नये म्हणून काही मंडळांनी मंडप टाकून वादन केले जात आहे. शहरात ८०पेक्षा अधिक ढोल-ताशापथके आहेत. छोट्या मंडळांनीही वादनास सुुरुवात केली आहे. ५ ते १० ढोल घेऊन हौशी कार्यकर्ते वादन करीत आहेत.
गणेशोत्सवासाठी नवीन कार्यकारणी निवडीसाठी बैठका होत आहेत. अनेक मंडळाचे नवीन पदाधिकारी निवडले गेले आहेत. नव्या अध्यक्षांचे अभिनंदनाचे फ्लेक्स झळकत आहेत. कार्यकारिणीच्या विविध कामांच्या समित्या तयार केल्या आहेत. त्यानुसार कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वर्गणी जमा करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा परवाना अत्यावश्यक असतो. मागील उत्सवाचा जमा-खर्च सादर करुन परवाना मिळविला जात आहे. पावती पुस्तकाची छपाई करुन घेण्यात आली आहे. वर्गणी जमा करण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. हातात पावतीपुस्तक घेऊन फिरणारे कार्यकर्ते बाजारपेठेत दृष्टीस पडत आहेत. त्याचबरोबर मंडळाच्या अहवालासाठी छपाई करवून घेतली जात आहे. मोठी मंडळ अहवालाकडे विशेष लक्ष देतात. आकर्षक अहवाल बनविण्यावर त्यांचा भर आहे.
गणेशोत्सवासाठी वेगवेगळ्या परवान्यांची गरज असते. ती मिळविण्यासाठी मोठ्या मंडळांनी चॉर्टर्ड अकाउंटंट किंवा संस्थांकडे काम दिले आहे. जाणकार पदाधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी असते.
‘श्रीं’च्या मूर्तीचे स्टॉल सजले
शहरातील ठिकठिकाणी गणेशाच्या मूर्तीचे स्टॉल सजले आहेत. सुबक आणि आकर्षक मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. एका फुटापासून चार फुटांपर्यंतच्या मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती काही ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. यामुळे बाहुबली चित्रपटातील महादेवाची पिंड उचलून नेताना गणपती, जय मल्हार रूपातील, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या रूपातील, तसेच नानाविध रूपे आणि आकारात मूर्ती आहेत.
मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे. देखाव्याच्या विषयावर चर्चा झाली असून, त्यासाठी एक समिती काम करीत आहे. विविध परवान्यांची जबाबदारी एकाकडे दिली आहे. अधिक चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तयारी केली जात आहे. जिवंत देखाव्याची संकल्पना तयार झाली असून, त्याचा सराव सुरू झाला आहे. त्यासाठी कार्यकर्ते आवश्यक तयारी करीत आहेत. त्या दृष्टीने मंडपाची सजावट केली जाणार आहे.
- राजाभाऊ गोलांंडे, अध्यक्ष,
गांधी पेठ तालीम मंडळ
गेल्या महिन्यांपासूनच अनेक पथकांनी ढोल-ताशा वादनाचा सराव सुरू केला आहे. पिंपरी-चिंचवड ढोल-ताशा पथक महासंघात ५२ नोंदणीकृत पथके आहेत. या व्यतिरिक्त २० ते ३० पथके आहेत. अनेक मंडळांनी ५ ते १० ढोल खरेदी करून वादन करीत आहेत. पारंपरिक वाद्यांकडे युवकांचा कल वाढत असल्याने अशी पथकांची संख्या वाढत आहे. पथकांना सामुदायिक परवानगी मिळाल्याने पोलीस उपायुक्तांसोबतची बैठक घेतली गेली नाही.
- अमर कापसे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड ढोल-ताशा पथक महासंंघ.