श्रमिकांच्या वस्तीत पुस्तकांचा जागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 04:48 AM2017-08-07T04:48:01+5:302017-08-07T04:48:01+5:30
वाचा म्हणजे श्रमिकाला त्याचा अर्थ कळेल... वाचा म्हणजे श्रमिकाला त्याचा हक्क मिळेल... या विचाराने वस्तीवस्तीतल्या विहारांमध्ये ग्रंथालय सुरू करून त्यातून पुस्तकांचा जागर करण्याचा विडा पुण्यातील उच्चशिक्षित विवेकी तरुण-तरुणींनी उचलला आहे.
धनाजी कांबळे
पुणे :वाचा म्हणजे श्रमिकाला त्याचा अर्थ कळेल... वाचा म्हणजे श्रमिकाला त्याचा हक्क मिळेल... या विचाराने वस्तीवस्तीतल्या विहारांमध्ये ग्रंथालय सुरू करून त्यातून पुस्तकांचा जागर करण्याचा विडा पुण्यातील उच्चशिक्षित विवेकी तरुण-तरुणींनी उचलला आहे. यात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजा ढाले यांची नात भाग्येशा कुरणे हिने पुढाकार घेतला आहे. ‘विहार तिथं ग्रंथालय’ असे त्यांच्या उपक्रमाचे नाव असून, शिक्षण, रोजगार सांभाळून तरुण-तरुणी पुण्यातील वाड्या, वस्त्यांमध्ये हे अभियान राबवीत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या संदेशातील एक सूत्र घेऊन भाग्येशाला हा उपक्रम सुचला. पुण्यातील दत्तवाडी येथील विहारातून सुरु झालेला हा उपक्रम सध्या ६ विहारांमध्ये सुरु असून, रत्नागिरीपर्यंत याचा सेतू बांधला गेला आहे. झोपडपट्टीतील मुलांच्या गुणवत्तेसाठी साऊ-रमाई शैक्षणिक प्रकल्पही राबवला जातो. त्यासाठी दररोज चार-पाच तास वेळ देऊन दहा ते बारा तरुण-तरुणी शिक्षणाचा जागर करीत आहेत.
आतापर्यंत हजारो पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप विहारांमधून करण्यात आले आहे. येत्या तीन वर्षात हा प्रकल्प राज्यभरात पोहोचविणार असल्याचे भाग्येशाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुस्तके आणि आर्थिक स्वरुपात मदत मिळाल्यास या उपक्रमास बळ मिळणार आहे.
‘बार्टी’ने द्यावा मदतीचा हात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे (बार्टी) या उपक्रमाला मदतीचा हात मिळाल्यास महाराष्ट्रातील हजारो विहारांच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोचवण्याचे मोठे काम होऊ शकते. तसेच वाचनसंस्कृतीला चालना मिळून झोपडपट्टीतील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाण वाढू शकते. त्यासाठी बार्टीने पुढाकार घेऊन या उपक्रमाला मदत करावी, अशी अपेक्षा भाग्येशा आणि तिच्या टीमने बोलून दाखविली.