भाजपाची जाणीवपूर्वक बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:51 AM2018-05-28T03:51:10+5:302018-05-28T04:53:52+5:30
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा तळागाळातल्या लोकांचा पक्ष असून तो कार्यकर्त्यांच्या फळीमुळे उभा आहे. मी केवळ भाषण करून इथपर्यंत आलो नाही, तर कार्यकर्त्यांच्या जोरावर आलो आहे.
पुणे - भारतीय जनता पार्टीमुळे राज्य घटना, दलितांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. मात्र, भाजपाला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. आंबेडकरांच्या संविधानाला धक्का लागलाच तर वाटेल ते बलिदान देण्याची माझी तयारी असून मंत्रिपदही सोडेन, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे सांगितले.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (आठवले गट) राज्यस्तरीय अधिवेशन झाले.
आरपीआय पक्ष हा केवळ दलित वस्तीचा नाही तर गावाचा पक्ष झाला पाहिजे, असे आठवले म्हणाले. शिवसेनेने भाजपाबरोबर युती करावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
बापट म्हणाले, आरक्षणाला धक्का लावण्याचा भाजपाचा कुठलाही विचार नाही. अॅट्रॉसिटी कायद्यातही बदल केला जाणार नाही.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा तळागाळातल्या लोकांचा पक्ष असून तो कार्यकर्त्यांच्या फळीमुळे उभा आहे. मी केवळ भाषण करून इथपर्यंत आलो नाही, तर कार्यकर्त्यांच्या जोरावर आलो आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पक्ष विस्तारला असून पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारातला भारत उभा करायचा आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी व्यक्त केले.आरपीआयच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या अधिवेशनात आठवले बोलत होते. ते म्हणाले, दलितांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी शासनाची चर्चा सुरू आहेत. तसेच शासनाने २०१४ पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना मान्यता द्यावी, गरिबांना ४५० स्क्वेअर फुटाचे घर द्यावे, दलितांचे कर्ज माफ करावे, गायरान पडीक जमिनींचा मुद्दा मार्गी लावावा, या अनेक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. काँग्रेसवर टीका करताना आठवले म्हणाले, की राहुल गांधी यांनी संविधानाची चिंता करू नये. संविधान बचाव मोर्चा काढण्याऐवजी त्यांनी काँग्रेस बचाव असा मोर्चा काढावा. कारण येत्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील काँग्रेस हद्दपार होणार आहे.