पेन्शन योजनेच्या लाभासाठी कामगारांची धावाधाव
By admin | Published: June 10, 2017 02:09 AM2017-06-10T02:09:14+5:302017-06-10T02:09:14+5:30
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गतच्या पेन्शन योजनेचे सदस्य असलेल्या कामगारांना पेन्शन रकमेत वाढ देण्यासंबंधिचा
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गतच्या पेन्शन योजनेचे सदस्य असलेल्या कामगारांना पेन्शन रकमेत वाढ देण्यासंबंधिचा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील कामगार कुटुंबीय सुखावले असले तरी त्यांना वाढीव पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
ज्या कंपनीतून कामगार निवृत्त झाले़ त्यातील बहुतांशी कंपन्या सद्या बंद आहेत. योजनेच्या लाभासाठी कराव्या लागणाऱ्या अर्जावर संबंधित कंपनी व्यवस्थापनाचा सही, शिक्का घ्यावा लागत असल्याने अनेकांवर बंद कंपन्यांच्या कार्यालयांचे उंबरे झिजविण्याची वेळ आली आहे.
औद्योगिक नगरीत अनेक कंपन्या कामगारांची सेवानिवृत्ती होण्याआगोदरच बंद पडल्या आहेत. कामगारांना त्यांच्या देय रकमा अद्याप पूर्णपणे मिळू शकल्या नाहीत. पेन्शन तर दूरची बाब आहे. पिंपरीतील गरवारे कंपनीतील कामगारांचा गेल्या २० वर्षांपासून देर रकमेच्या मागणीसाठी लढा सुरू आहे.
फतेजा फोर्जिंग, पूना बॉटलिंग, कार्ड क्लोदिंग, फिलीप्स तसेच अन्य या कंपन्या बंद झाल्या. काही कंपन्या स्थलांतरित झाल्या. या कंपन्यांमध्ये काम केलेल्या कामगारांना अद्यापही पेन्शन स्वरूपात काहीतरी लाभ पदरात पडेल, अशी आशा आहे. यातील काही कंपन्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या हातात पेन्शन स्वरूपात काही रक्कम पडत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून कामगार कुटुंबीय आता बँक अधिकारी तसेच कंपन्यांच्या कार्यालयात धाव घेऊ लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाखाहून अधिक कामगार पेन्शन लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.