कामगारदिनीच कामगार पुतळा उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:19+5:302021-05-03T04:06:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कामगार गौरव म्हणून कधी काळी थाटात उभ्या केलेल्या कामगार पुतळ्याचा महापालिकेला कामगारदिनीच विसर पडला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कामगार गौरव म्हणून कधी काळी थाटात उभ्या केलेल्या कामगार पुतळ्याचा महापालिकेला कामगारदिनीच विसर पडला. काँग्रेसच्या युवक शाखेने पुतळ्याला पुष्पहार घालून कामगारांचा सन्मान कायम ठेवला. त्याआधी पुतळ्याची डागडुजी व रंगरंगोटीही केली.
जिल्हा न्यायालयाच्या बरोबर मागे हा कामगार पुतळा आहे. विचारमग्न स्थितीतील हा पुतळा पुण्याची खास ओळख आहे. प्रत्येक कामगारदिनी या पुतळ्याला अभिवादन केले जाते. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात पुतळ्यांची साफसफाई हा विषय आहे. त्यातही ज्यांची जयंती पुण्यतिथी असते अशा पुतळ्यांना त्या दिवशी अभिवादनही केले जाते. कामगार पुतळ्यालाही कामगारदिनी हा सन्मान दिला जात होता.
मात्र, यंदाच्या कामगारदिनी महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनाही याचा विसर पडला. गेले काही महिने या पुतळ्याकडे महापालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्याचा रंग उडाला आहे. काही मोडतोडही झाली आहे. कामगार दिन लक्षात घेऊन महापालिकेने पुतळ्याचे काम करून घेणे गरजेचे होते.
काँग्रेसच्या युवक शाखचे वरिष्ठ उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांनी शनिवारी कामगार पुतळ्याची डागडुजी केली. त्याला रंग दिला व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहराध्यक्ष विशाल मलके, नीलेश सांगळे, परवेझ तांबोळी, सौरभ शिंदे, अक्षय नवगिरे या वेळी उपस्थित होते.
स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी स्थानिक नगरसेवक, अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीची मागणी केली. त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अमराळे यांनी केला. भारतीय जनता पार्टी प्रणीत केंद्र सरकार भांडवलदारांचे हस्तक झालेच आहे, त्यांचे हे धोरण झिरपत झिरपत पुण्यातील त्या पक्षाच्या आमदार तसेच महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांपर्यंत आले आहे, अशी टीका त्यांनी केली.
फोटो : कामगारदिनीच महापालिकेने उपेक्षित ठेवलेल्या कामगार पुतळ्याची युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी स्वच्छता केली व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
(फोटो - कामगार पुतळा नावाने आहे)