कामगार पुतळा वसाहत पुलाखाली फेकला कोविडचा कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:03+5:302021-04-30T04:13:03+5:30
पुणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे खाजगी रुग्णालयांसह महापालिकेची कोविड केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये जमा होणारा ...
पुणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे खाजगी रुग्णालयांसह महापालिकेची कोविड केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये जमा होणारा रुग्णांचा जैववैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत खबरदारी बाळगली जात असली तरी एक टेम्पो भरेल एवढा जैववैद्यकीय कचरा नदीपात्रात फेकून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामगार पुतळा वसाहत जवळील रेल्वे पुलाखाली हा कचरा फेकून देण्यात आला आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मागील दोन महिन्यात कोविड कचरा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसाला साधारण आठ ते दहा मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. पास्को या कंपनीसोबत महापालिकेने करार केला असून या कंपनीमार्फत हा कचरा इन्सिनरेटरमध्ये जाळून नष्ट केला जातो. यामध्ये रुग्णांनी वापरलेल्या वस्तू, कपडे, चादरी आदींचा समावेश आहे. या सोबतच उपचारांसाठी लागणारे पीपीई किट, हातमोजे, मास्क आणि वैद्यकीय साधनांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.
कामगार पुतळा वसाहतीजवळील रेल्वे पुलाखाली हा सर्व कचरा पडल्याचे बुधवारी दुपारी स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर या कचऱ्याचे फोटो काढून सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना पाठविले. हा कचरा तात्काळ हटविण्याची मागणी रहिवाश्यांकडून करण्यात आली आहे. हा प्रकार खासगी रुग्णालयांकडून घडला की पालिकेच्या रुग्णालयाकडून याबाबत खात्रीशीर सांगता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार गंभीर असून योग्य ती कार्यवाही केली जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.