कामगारांनी घेतली शपथ

By admin | Published: March 6, 2016 01:04 AM2016-03-06T01:04:14+5:302016-03-06T01:04:14+5:30

औद्योगिक सुरक्षा सप्ताहाला शुक्रवारी सुरुवात झाली. या निमित्ताने शहरातील विविध कंपन्यांमध्ये कामगारांनी राष्ट्रीय सुरक्षिततेची शपथ घेतली.

Workers took oath | कामगारांनी घेतली शपथ

कामगारांनी घेतली शपथ

Next

पिंपरी : औद्योगिक सुरक्षा सप्ताहाला शुक्रवारी सुरुवात झाली. या निमित्ताने शहरातील विविध कंपन्यांमध्ये कामगारांनी राष्ट्रीय सुरक्षिततेची शपथ घेतली. तसेच, ध्वजवंदन, शून्य अपघात फायर फायटिंग, तातडीच्या अपघातासंबंधी प्रात्यक्षिके, सुरक्षेसंदर्भात व्याख्यान, घोषवाक्ये, भित्तिचित्र स्पर्धा आणि बक्षीस वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
औद्योगिकनगरीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह ११ मार्चपर्यंत आहे. त्यांची सुरुवात शुक्रवारी झाली. कंपनीत अपघाताचे शून्य प्रमाण ठेवून, सुरक्षितपणे उत्पादन घेण्याबाबत सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
एमआयडीसी, भोसरी येथील सेंच्युरी एन्का कंपनीत सप्ताहाची सुुुरुवात झाली. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक ए. डी. खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी व्यवस्थापक आर. बात्रशा, अतिरिक्त व्यवस्थापक वाय. एम. कामत, मनुष्यबळ विभागाचे सरव्यवस्थापक ए. के. सहेल, सुरक्षा व्यवस्थापक अमोल शहा आदी उपस्थित होते.
खोत म्हणाले, ‘‘काम करताना कामगारांची शारीरिक व मानसिक स्थिती योग्य नसल्यास अपघात घडू शकतात. याशिवाय वेळेत काम पूर्ण करण्यासाठी कामगारावर असलेला अतिरिक्त ताण आणि कामाच्या असुरक्षित ठिकाणी अपघात घडतात. कामाच्या ठिकाणी दृश्य स्वरुपातील धोके लक्षात येतात. मात्र, डोळ्यांना सहजपणे न दिसणारे धोके ओळखण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासते. भोपाळ दुर्घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कंपनी कायद्यात सकारला बदल करावा लागला.’’
कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष एस. वाय. अगशीमनी यांनी अपघातांची टक्केवारी विशद केली. देशात केलेल्या सर्वेक्षणात नैसर्गिक घटकांमुळे २ टक्के, असुरक्षित वातावरणामुळे १ टक्का, तर ९० टक्के अपघात हे मानवाच्या असुरक्षित कृती व वर्तनामुळे होत असल्याचे नमूद केले आहे. मात्र, अशा प्रकारच्या सुरक्षितता सप्ताहामुळे कामगारांमध्ये अपघाताविषयी जागृती होत असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहेत.
तसेच विविध कंपन्यांमध्ये सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कामगारांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले जाते. (प्रतिनिधी)
थिसेनकु्रप इंडस्ट्रीज कंपनीत झालेल्या कार्यक्रमात कामगारांनी सुरक्षेसंदर्भात सामुदायिक शपथ घेतली. ध्वजारोहण कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डी. एन. दमानिया यांच्या हस्ते झाले. या वेळी कार्यकारी संचालक मलई दास, संचालक गौतम घोष, तांत्रिक उत्पादन संचालक सुहास तलाठी, मनुष्यबळ विकास अधिकारी मनोज राणे, अधिकारी रणजित मोहिते, आरोग्याधिकारी डॉ. डी. के. जोशी, थिसेनकु्रप कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल गोडसे, जयवंत डावरे आदी उपस्थित होते. चिंचवड स्टेशन येथील स्पॅको टेक्नॉलॉजीजमध्ये सुरक्षेबाबत कामगारांना माहिती देण्यात आली. सुरक्षा अधिकारी स्वामिनाथन सुकाळे यांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ अधिकारी श्रीराम सराफ, मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी प्रकाश मिरजकर, श्रमिक
एकता महासंघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय येळवंडे, स्पॅको एम्प्लॉईज युनियनचे सचिव जालिंदर काळभोर आदी उपस्थित होते. सप्ताहामध्ये घोषवाक्य, निबंध आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे.

Web Title: Workers took oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.