शहरात सुरक्षासाधनांशिवाय राबताहेत कामगार
By Admin | Published: July 7, 2017 03:39 AM2017-07-07T03:39:39+5:302017-07-07T03:39:39+5:30
सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सेफ्टी शूज अशा कोणत्याही सुरक्षासाधनांशिवाय कामगारनगरीमध्ये कामगार राबत असल्याचे धक्कादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सेफ्टी शूज अशा कोणत्याही सुरक्षासाधनांशिवाय कामगारनगरीमध्ये कामगार राबत असल्याचे धक्कादायक चित्र सर्रास पहायला मिळत आहे. रोजीरोटीसाठी लाख मोलाचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे, हे यावरुन अधोरेखीत होते.
महावितरण, रंगकाम असो किंवा जाहिरात फ्लेक्स या सर्वच क्षेत्रात असंघटीत कामगार काम करत आहेत. या कामगारांना सुरक्षासाधने पुरविण्याची जबाबदारी संबंधित कंपनी अथवा ठेकेदाराची असते. मात्र, पैशांची बचत अथवा अफरातफर करण्यासाठी सुरक्षासाधनांची खरेदीच केली जात नाही. त्यामुळे नाईलाजास्तव या कामगारांना सुरक्षासाधनांशिवाय धोकादायक पद्धतीने काम करावे लागते.
औद्योगिक क्षेत्रात छोट्या वर्कशॉपमध्ये कामगारांच्या सुरक्षासाधनांबरोबरच आगप्रतिबंधक यंत्रणा, आपत्कालिन यंत्रणा, सायरन आदींचा अभाव पहायला मिळतो. सुरक्षासाधने नसल्याने यापूर्वी औद्योगिकनगरीत अनेक दुर्घटना झाल्याची उदाहरणे सांगता येतील. मात्र, या दुर्घटनांवरुन संबंधित कंपन्या अथवा ठेकेदार कोणताच धडा घेत नाहीत.
अकुशल कामगार आपल्या संरक्षणाच्याबाबतीत जागरुक नसल्याचे चित्रही समोर येते. बांधकाम व्यवसायाच्या साईटवर कोणत्याही प्रकारचे सुरक्षासाधन न वापरता २०व्या मजल्यापर्यंत काम करावे लागते. यातून उद्भवणाऱ्या धोक्याचे कामगार आणि ठेकेदार दोघांनाही सोयरसुतक नाही की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
कामगार कल्याण मंडळाने अशा असंघटित कामगारांच्या सुरक्षेविषयी ठोस पावले उचलून सुरक्षासाधनांची सक्ती आणि अंमलबजावणी करणे, आवश्यक आहे.