लॉकडाऊनच्या भीतीने कष्टकरीवर्गाची गावाकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:09 AM2021-04-13T04:09:47+5:302021-04-13T04:09:47+5:30
राज्यात लॉकडाऊन होणार हे निश्चित झाल्याने अनेकांनी मिळेल, त्या वाहनाने गावाकडे जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. हडपसरमधील सासवड ...
राज्यात लॉकडाऊन होणार हे निश्चित झाल्याने अनेकांनी मिळेल, त्या वाहनाने गावाकडे जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. हडपसरमधील सासवड रस्त्यावर बारामती, फलटणकडे जाणाऱ्या गाड्याच्या व रविदर्शनसमोर एसटी बसथांब्यावर गावाकडे जाण्यासाठी कामगार वर्गाने गर्दी केली होती.
एसटी बससह मिळेल. त्या वाहनाने कामगारवर्ग आई-वडिलांसह आपल्या मुलाबाळांना घेऊन गावाकडे जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. कोरोनाची प्रचंड भीती वाढत आहे. कडाक्याचे उन्ह वाढत आहे. रोजगार मिळत नाही, उपाशी मरण्याची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी जे लॉकडाऊनमध्ये अडकले, चार महिने घरात बसून होते. त्यांना गेल्या वर्षीची परिस्थिती माहिती असल्याने या वर्षी या लॉकडाऊनमध्ये न अडकता आपल्या गावी गेलेले चांगले, असा विचार करुन नोकरी व्यवसायनिमित्त आलेले लोक गावाकडे धाव घेत आहेत.
मागील वर्षी पहिल्या लॉकडाऊनमध्ये अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी अन्नधान्याचे किट वाटले, त्यामुळे काही त्रास जाणवला नाही. मात्र, मागील महिन्याभरापासून कोरोनाचे संकट गडद होत असल्याने अनेक ठिकाणची कामे बंद झाली आहेत. हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद नसला तरी अवघा १०-१५ टक्के सुरू आहे. त्यामुळे तेथील कामगारवर्ग बेकार झाला आहे. बांधकामे ठप्प झाली आहेत, कुठेही कामधंदा मिळत नाही, आता इथे राहून करायचे तरी काय, अशी विचारणा या मंडळींकडून केली जात आहे.
ज्यांच्या मुलांच्या दहावी-बारावीतील मुलांची परीक्षा आहे, त्यांना नाइलाजास्तव येथे राहावे लागत आहे. मात्र, ज्यांना काहीच आधार नाही, अशा मंडळींनी परीक्षेच्या वेळी परत येऊ अशी भूमिका घेतली होती.