कार्यालयास जागा हवी; १४ कोटी भरा
By admin | Published: February 19, 2016 01:44 AM2016-02-19T01:44:39+5:302016-02-19T01:44:39+5:30
येरवडा येथील शासनाच्या मालकीची ५५ गुंठे जागा पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी देण्यात येणार आहे
पुणे: येरवडा येथील शासनाच्या मालकीची ५५ गुंठे जागा पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी देण्यात येणार आहे. ही जागा सवलतीच्या दरात देण्याची मागणी पीएमआरडीए केली होती. परंतु पीएमआरडीए स्वतंत्र प्राधिकरण असल्याने सवलतीच्या दरात जागा देणे शक्य नसून, प्रस्तावित बाजार मूल्यानुसार १४ कोटी २५ लाख रुपये एकरकमी भरल्यानंतर जागेचे हस्तांतर करण्यात येईल, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने पीएमआरडीएला पाठविले आहे.
पीएमआरडीएची स्थापन झाल्यानंतर कार्यालयाच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. सुरुवातील पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणात तात्पुत्या स्वरूपात कार्यालय सुरू करण्यात आले. येथे जागा कमी पडू लागली म्हणून हे कार्यालय औंध येथील भीमसेन जोशी नाट्यगृहात हलविण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत पीएमआरडीएच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने सध्या कार्यालय सुरूअसलेली जागादेखील कमी पडत आहे. यामुळे तातडीने येरवडा येथील प्रस्तावित जागेत स्वत:चे स्वतंत्र कार्यालय सुरूकरण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येरवडा येथील जागा शासनाच्या मालकीची असून, प्राधिकरणासाठी सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. परंतु पीएमआरडीए हे स्वतंत्र प्राधिकरण असून, शासनाची जागा सवलतीमध्ये देता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार सध्याच्या रेडीरेकनरच्या दरानुसार ५५ गुंठे जागा १४ कोटी २५ लाख ७७ हजार रुपयांना उपलब्ध करून देता येईल, असे स्पष्ट केले. या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या पीएमआरडीएच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. १४ कोटी रुपयेदेखील टप्प्या-टप्प्याने भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी पीएमआरडीएने केली, परंतु ही मागणीदेखील मान्य करता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.