संतविचारांची पुण्यात कार्यशाळा; वारकरी संप्रदायाचे विचार रुजविण्याच्या उद्देशाने तज्ज्ञांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:32 PM2017-12-20T13:32:14+5:302017-12-20T13:45:41+5:30
वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि संतांचे विचार तरुण पिढीत रुजविण्याच्या उद्देशाने शनिवारी (ता. २३) पुण्यातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संतविचार अभ्यासवर्ग आयोजन केले आहे.
पुणे : वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि संतांचे विचार तरुण पिढीत रुजविण्याच्या उद्देशाने शनिवारी (ता. २३) पुण्यातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संतविचार अभ्यासवर्ग आयोजन केले आहे. संत साहित्यातील ज्येष्ठ अभ्यासक, उपासक या अभ्यासवर्गास मार्गदर्शन करणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, चोपदार फाउंडेशन, वारकरी सेवा संघ आणि व्यसनमुक्त युवक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास उद्योजक युवराज ढमाले, प्रफुल्ल तावरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या वेळी संत साहित्याचे अभ्यासक, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचे बीजभाषण होईल. दुपारी बारा वाजता संतविचार दैववादी व निष्क्रिय करणारा आहे का, या विषयावर ज्येष्ठ कीर्तनकार रामभाऊ महाराज राऊत हे मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता संतविचार व सामाजिक बांधिलकी या विषयावर ज्येष्ठ कीर्तनकार सुधाकर महाराज इंगळे हे तर दुपारी तीन वाजता संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार हे संतांचे सामाजिक योगदान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार, तुरुंग पोलिस महासंचालक विठ्ठलराव जाधव, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभ्यासवर्गाची सांगता होईल, अशी माहिती संयोजक रामभाऊ चोपदार, किशोर कामठे, अविनाश सूर्यवंशी यांनी दिली.