World AIDS Day | पुण्यात ११ महिन्यांत १ हजार १३६ जणांना एचआयव्हीची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 09:35 PM2022-11-30T21:35:18+5:302022-11-30T21:36:29+5:30
एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबरला ‘जागतिक एड्स दिन’ पाळला जाताे..
पुणे : शहरात जानेवारी ते ऑक्टाेबर या अकरा महिन्यांत संशयित पुरुष, महिला, मुले, मुली, गर्भवती व तृतीयपंथीय मिळून एकूण ७२ हजार ८२२ जणांची एचआयव्हीसाठी तपासणी केली. त्यापैकी ११३६ जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याची नाेंद केली आहे. यात सर्वाधिक प्रमाण पुरुषांचे आहे.
एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबरला ‘जागतिक एड्स दिन’ पाळला जाताे. यंदाची थीम ही ‘इक्विलाईज’ (समानता पाळा) अशी आहे. म्हणजेच एचआयव्ही बाधितांना समानतेची वागणूक द्या, अशी आहे. या आजाराबाबत आता समाजात पुरेशी जनजागृती झालेली आहे, त्यामुळे रुग्णसंख्या वर्षानुवर्षे घटत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे महापालिका व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पालिका दवाखाने, प्रसूतीगृह रुग्णालयांत येणारे रुग्ण, गर्भवती महिला, त्यांचे नातेवाईक, यांच्याकरिता एचआयव्ही, एड्सविषयी समुपदेशन व चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. शहरातील जवळपास २० ठिकाणी समुपदेशन व तपासणी केंद्रे आहेत. शास्त्रीनगर येरवडा येथे गंगाराम कर्णे दवाखाना येथे मोफत एआरटी औषध उपचार सुविधा आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेमार्फत रांगोळी व पोस्टर प्रदर्शन, जनजागृती रॅली, पुणे शहरातून डिस्प्ले व्हॅनद्वारे जनजागृती, पथनाट्याद्वारे जनजागृती, सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, प्रसुतीगृहे यातून जनजागृती करण्यात येत आहे.
जानेवारी ते ऑक्टाेबर २०२२
तपासणी - पुरुष - महिला - मुले - मुली- तृतीयपंथी - गर्भवती - खासगी रुग्णालय- एकूण
रक्त चाचणी - २८,५७५ - १८,८९३- ६३६ - ४९० - १३२ - २४,०९६ - ....... - ७२,८२२
बाधित - ६१७ - ४१० - ४- ५ - १३ - ४८ - ३६ - १,१३६
एड्स दिनानिमित्त शहरात सर्व खासगी, सरकारी, मनपा माध्यमिक शाळांतून जनजागृती, महाविद्यालयातून एनएसएस विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. रेड लाईट एरियातील महिलांसाठी महिला मेळावा कार्यक्रमातून जनजागृती, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतून जनजागृती, युवक व युवतींसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तसेच सर्व कार्यक्रमातून आराेग्य शिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
- डाॅ. सूर्यकांत देवकर, प्रमुख, पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था