जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिन : व्यसनांच्या नशेत धुंद तरुणाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:04 PM2019-06-26T14:04:50+5:302019-06-26T14:36:34+5:30
पुण्यात अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मोठी वाढ होऊ लागली असून या व्यसनांच्या विळख्यामध्ये तरुणाई जखडली जात आहे.
पुणे : एरवी झोपडपट्टीतील मुलांमध्ये आढळून येणाऱ्या गांजा, चरस अशा अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातील १५ ते २६ वयोगटातील मुलांमध्येही वाढत चालले असून गांजाचा वापर सर्वाधिक होत असल्याचे चित्र आहे. यासोबतच स्टॅम्प आणि ई-सिगारेटचे व्यसन करण्याकडे अधिक कल असल्याचा निष्कर्ष व्यसनमुक्ती केंद्र चालविणाऱ्या संस्थांकडून काढला गेला आहे.
मुंबईपाठोपाठ पुणेही आता कॉस्मोपॉलिटन शहर बनले आहे. पुण्यात अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मोठी वाढ होऊ लागली असून या व्यसनांच्या विळख्यामध्ये तरुणाई जखडली जात आहे. विशेषत: शहरातील विविध भागात छुप्या आणि उघड पद्धतीने सुरु असलेल्या हुक्का पार्लर्समध्ये नशेचे साहित्य राजरोसपणे विकले जात आहे. हे हुक्का पार्लर्स पालकांची डोकेदुखी ठरत आहेत. हुक्क्यामध्ये विविध स्वरुपाचे फ्लेवर मिसळले जात असून त्यातून तंबाखू आणि ड्रग्जचे मिश्रण दिले जात आहे. त्यामध्ये कोकेन आणि एमडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मोसंबी, संत्रा, आंबा, व्हॅनिला अशी दोन-चार नव्हे तर तब्बल ५२ फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. प्रिमियम फ्लेवर्सचे ११, तर इकोनॉमी फ्लेवर्सचे तब्बल ४१ फ्लेवर्स बाजारात सध्या उपलब्ध आहेत. प्रमियम फ्लेवर्समध्ये ब्लूबेरी, बॉम्बे पानमसाला, डबल अ?ॅप्पल, सिल्व्हर फॉक्स, स्ट्रॉबेरी असे विविध स्वाद आहेत. तर इकोनॉमी फ्लेवर्समध्ये चॉकलेट, चोको मिन्ट, नारळ, कॉफी, बबलगम, केळे, कोला अशा ४१ फ्लेवर्सचा यात समावेश आहे.
यासोबतच मेफेड्रोन ही सध्या तस्करांसाठी चलनी नोट ठरत आहे. एमडीच्या सेवनाची एकदा सवय जडली की ती सहसा सुटत नाही. एमडीच्या सेवनाने लैंगिक क्षमता वाढत असल्याच्या अपप्रचारामुळेही त्याची मागणी वाढली आहे.
सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये नायजेरीयन तरुण सर्वाधिक सक्रीय आहेत. दक्षिण आफ्रिका, युरोप आणि आशिया या ह्यगोल्डन कॉरीडोरह्ण मधून कोकेन, ब्राऊन शुगर सारख्या महागड्या नशेच्या साहित्याची तस्करी केली जात आहे. शहरातील काही नामवंत आणि उच्चभ्रु महाविद्यालयांमध्ये ड्रग विक्रेत्यांनी जाळे निर्माण केले आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा, कोंढवा, वानवडी, लष्कर, येरवडा, विमाननगर, बाणेर, हिंजवडी, पाषाण आदी परिसरात अधिक मागणी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
=====
रेव्ह पार्टी, हुक्का व मद्य पार्ट्या आयोजित केल्या जातात. सोशल नेटवर्किंग साईट्सवर आणि व्हॉट्स अॅपवर अॅक्टीव्ह असलेल्या तरुणाईपर्यंत ही व्यसनाची साधने पोचवणे सोपे झाले आहे. त्यातच शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेल्या तरुणांकडे त्यांच्या पालकांचे लक्ष नसते. आपली मुले कुठे जातात, काय करतात याकडे पहायला पालकांना वेळ नाही. त्यामुळे असे सावज हे डीलर्स शोधत असतात. अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये सर्वाधिक प्रमाण महाविद्यालयीन तरुणांचेच आहे.
====
शाळकरी मुलांमध्ये व्हाईटनर, व्हेंसेडील, पॉलिश लिक्विडच्या सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. त्यांचे कौमार्य आणि तारुण्य या व्यसनांमुळे कुस्करले जात आहे. यासोबतच स्टिकर नावाचा एक अमली पदार्थ मिळतो. हा पदार्थ जिभेवर ठेवला ही त्याची नशा होते. नायट्रेक्स टॅब्लेट्सही बाजारात उपलब्ध आहेत.
====
इंटरनेट अॅडिक्शन, तासनतास मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर अॅक्टीव्ह असणे, सतत पॉर्न साईट्स अथवा पॉर्न क्लिप पाहात राहणे हा सुद्धा मानसिक आजाराचा एक ट्रेंड समोर येऊ लागला आहे. ई-सिगारेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या दोन वर्षात गांजा सेवनाचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गांजा सहज उपलब्ध होत आहे. हुक्का आणि त्यामधून नशा याचे प्रमाणही वाढत चालले आहे. योग्य माहिती, समुपदेशन आणि जनजागृती यातून वाढत्या व्यसनाधिनतेवर अंकुश मिळवता येऊ शकेल.