जागतिक वेश्या व्यवसाय विरोधी दिन विशेष : वेश्या व्यवसायातील नवीन भरती रोखणारा 'पुणे पॅटर्न'!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:20 PM2020-10-05T13:20:40+5:302020-10-05T13:26:50+5:30
पुण्यातील बुधवार पेठ हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे 'रेड लाईट' क्षेत्र आहे.
पुणे : पुणे शहरातील बुधवार, शुक्रवार पेठ ही पूर्वापार कुंटणखान्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशभरातूनच नाही तर अगदी बांगला देशातूनही अल्पवयीन मुलींची फसवणूक करुन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या या मध्य वस्तीतील रेड लाईट एरियात अल्पवयीन तसेच नव्याने कोणी येऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी एक उपक्रम राबविला होता. त्यातून या ठिकाणी येणाऱ्या अल्पवयीन मुलींची तस्करी पूर्णपणे थांबविण्यात पोलिसांना यश आले आहे.
आता त्याचा प्रसार इतरत्रही होऊ लागला आहे. दोन तीन वर्षापूर्वी सुहास बावचे हे परिमंडळ एकचे उपायुक्त असताना त्यांनी हा उपक्रम सुरु केला. बुधवार व शुक्रवार पेठेत साधारण ७०० कुंटणखाने असून सुमारे ३ हजार महिला देहविक्रय करतात. या सर्व महिलांचे सर्व्हेक्षण पोलिसांनी केले. त्यांची संपूर्ण माहिती, आधार कार्ड, फोटो असे रजिस्टर बनविण्यात आले. पोलीस नियमितपणे या कुंटणखान्यात जाऊन तपासणी करत असत. तसेच त्या ठिकाणी कोणी नवीन महिला, अल्पवयीन मुली आली आहे का हे तपासत. याचवेळी या परिसरात गंमत म्हणून रात्री अपरात्री फिरायला येणारे, तरुणींची टिंगल टवाळी करणाऱ्यांची मोठी संख्या असते. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी दररोज रात्री या भागात नाकाबंदी सुरु केली. त्याचा परिणाम येथे निष्कारण भटकणाऱ्यांची संख्या कमी झाली. तसेच अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय ढकलण्याचे प्रमाण जवळपास बंद झाले.त्याचबरोबर एखादी मुलगी येथे आली तर तिची माहिती पोलिसांना मिळू लागली.
लॉकडाऊनच्या काळात हा वेश्या व्यवसाय पूर्णपणे बंद होता. तेव्हा पोलीस सोशल सर्व्हिसच्या माध्यमातून या महिलांना पोलिसांनी उपजिविकेसाठी रेशन पुरविले होते. येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या संख्येतही आता घट झाली आहे. अनेक महिला आता वेगळा व्यवसाय शोधण्याच्या तयारीत आहेत.
.........
वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर पिठा अंतर्गत कारवाई केली जाते. सामाजिक संस्थांची मदत घेऊन या महिलांचे समुपदेशन, जनजागृती आणि कारवाई अशा तीन स्तरावर पोलीस कार्यरत असतात. शहराच्या इतर भागातही चालणाऱ्या अनैतिक व्यवसायावर पोलिसांची नजर असून त्यांच्यावर कारवाई केली जात असते. अशा व्यवसायातील महिलेवर देशात प्रथमच मोक्का कारवाई पुणे पोलिसांनी केली होती.
अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त,
........
रेड लाईट एरियात वेश्या व्यवसायात नवीन तरुणी, महिला विशेषत: अल्पवयीन मुली ढकलल्या जाऊ नयेत, म्हणून उपक्रम सुरु करण्यात आला होता. त्याला चांगले यश मिळून जवळपास ५० टक्के वेश्या व्यवसाय कमी झाला आहे.
सुहास बावचे, पोलीस उपायुक्त
......
पुणे पोलिसांनी सुरु केलेला हा उपक्रम लॉकडाऊनच्या काळात बंद झाला होता. आता शहरातील व्यवसाय सुरळीत होत आहे. आता पुन्हा हा उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १़
़़़़़़