मोटार चालविताना संयम संपतो! पुण्यात मोटारीपेक्षा सायकलच भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 11:49 AM2022-06-04T11:49:16+5:302022-06-04T11:50:39+5:30
खर्च वाचेल आणि फक्त पाच-सहा मिनिटेच जास्त लागतील...
पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विश्वास नसल्याने पुण्यात मोटारींची संख्या वाढत आहे. एखाद्या ठिकाणी तातडीने पोहोचायचे असल्यास किंवा कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी मोटारीचा वापर होतो. पण, पुण्यातील गर्दी लक्षात घेता मोटारीपेक्षा सायकलच भारी ठरत आहे. अगदी सहा किलोमीटर अंतर जायचे असले तरी मोटारीपेक्षा सायकलला केवळ पाच ते सहा मिनिटे जास्त वेळ लागतो. पण, या बदल्यात खर्च कमी होतोच आणि आरोग्यासाठीही फायदा होतो.
परिसर आणि एसपीटीएम या दोन संस्थांनी ‘जागतिक सायकल दिना’च्या निमित्ताने केलेल्या प्रयोगात ही बाब समोर आली आहे. तीन दिवस गर्दीच्या वेळी, शहरातल्या १०० किलोमीटर रस्त्यांवर सायकल आणि गाडीचा वापर करून एकाच अंतराला चारचाकी गाडीच्या तुलनेत सायकलीला किती वेळ लागतो याची नोंद केली. यातून दिसून आले की एक किलोमीटर अंतराला सायकलीला फक्त ४५ सेकंद ते १ मिनिट जास्त वेळ लागतो. तुमचे अंतर ६ किलोमीटरचे असेल, तर कार वापरल्याने ५-६ मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाचत नाही. त्याच वेळी सायकलीमुळे वायुप्रदूषण होत नाही आणि सायकलीला रस्त्यावर जागादेखील कमी लागते. खूप ट्रॅफिक होते तेव्हा सायकलीचा वेग कारपेक्षा जास्त होता.
पुण्यात मोटार चालविताना संयम संपतो!
अश्विनी सोवनी ह्या कामावर जाण्यासाठी सायकल वापरतात. त्या म्हणतात, “पुण्यासारख्या शहरात सायकल हे अगदी योग्य वाहन आहे. विशेष करून ६ ते ८ किलोमीटरच्या छोट्या अंतरासाठी सायकल शहरातल्या हवेच्या प्रदूषणात भर घालत नाही. सायकल चालविणाऱ्या व्यक्तीला आरोग्याचा फायदाही होतो. मिहीर देव यांनी चारचाकी चालक म्हणून भाग घेतला होता. ते म्हणाले, गाडी चालवताना रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीमुळे आपला संयम संपतो. त्यामुळे मी आनंदाने सायकल चालवतो. परदेशात सायकल चालवणाऱ्यांना मान मिळतो, त्यांचं कौतुक असतं. त्यामुळे तिथे सायकल चालवणं सुरक्षित तर आहेच; पण आनंददायीदेखील आहे.