वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे' : नाल्याच्या पाण्यावर पोसली २७ हजार झाडांची वनराई : 'ग्रीन थंब'चा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 06:42 AM2021-05-22T06:42:00+5:302021-05-22T06:45:02+5:30
कोविड काळात नाल्यावर फुलले नंदनवन.....
लक्ष्मण मोरे
पुणे : नाल्यामधून नदीपात्रात जाणाऱ्या मैलापाण्यामुळे खालील गावांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे पाणी नदीमध्ये जाऊ नये याकरिता कोविड काळात घोरपडी येथील सोपानबागे शेजारील नाल्यावर सुरू झाला अनोखा प्रयोग. नाला खोलीकरण-रुंदीकरण करून दीड वर्षात तब्बल २७ हजार झाडे लावण्यात आली. नाल्याचे पाणी वळवून पाच तळ्यांमध्ये आणण्यात आले. हे पाणी झाडांना देण्यात आले. आजमितीस याठिकाणी पपई, पेरू, केळी, नारळ आदी फळझाडे लगडली आहेत. तर, अनेक प्रकारची फुलझाडे बहरून डोलू लागली आहेत. सगाचीही लागवड करण्यात आली आहे. ही किमया साधली आहे 'ग्रीन थंब' या संस्थेच्या पुढाकारातून.
लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील यांच्या ग्रीन थंब संस्थेने यापूर्वी खडकवासला धरणातील गाळ काढून तेथेच सुंदरशी वनराई फुलवली आहे. कोरोना काळात सर्वाधिक आवश्यकता भासते आहे ती ऑक्सिजनची आणि या नाला गार्डनमध्ये ऑक्सिजन पार्क निर्माण झाले आहे. या उपक्रमात अनेक पर्यावरण प्रेमी गटही सहभागी झाले आहेत. लोकसहभागातून याठिकाणी जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. विविध प्रजातींची तब्बल २७ हजार झाडे लावण्यात आली. यामध्ये १३ हजार बांबूच्या झाडांचा समावेश आहे. तब्बल दोन किलोमीटरचा परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य करण्यात आला आहे.
-----
नाल्याच्या पाण्यामध्ये नायट्रोजन, कॅल्शियम यासोबतच झाडांना आवश्यक असलेली सर्व पोषणमूल्ये असल्याने झाडांना त्याचा फायदा झाला. ही झाडे आठ नऊ महिन्यांची असली तरी त्याची वाढ आठ ते दहा वर्षांची झाडे असल्यासारखी झाली आहे. वर्षभरातच झाडांना फळे - फुले धरू लागली आहेत. नाल्याच्या पाण्यावर फुलवलेली ही बाग पाहून अनेक तरुण आणि उत्साही नागरिक या कामात जोडले जाऊ लागले आहेत.
-----
पुण्यामध्ये महत्वाचे सात ओढे आहेत. त्यांचे आता नाले-गटार झाले आहेत. यातील हा नाला एक आहे. मागील वर्षी शहरात पूर आलेला असतानाही या नाल्याचे खोलकरण आणि रुंदीकरण करण्यात आल्याने इथे मात्र पूर आला नाही. तसेच झाडेही सुरक्षित राहिली.
-----
या कामामध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठी मदत केली. त्यांनी ही वनराई फुलविण्यासाठी यंत्र सामुग्री दिली आहे. या नाल्याची वनराई आता भैरोबानाल्यापर्यंत वाढविली जाणार आहे. या कामासाठीही पाटेकर यांनी मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.
-----
पूर्वी या नाल्याचा परिसर रुक्ष होता. याठिकाणी झाडांची लागवड करण्यात आली. मोरांसाठी मक्याची झाडे लावण्यात आली. तर, पोपटांसाठी सूर्यफूल लावण्यात आले. आता या बागेत मोर, पोपट, चिमण्या, बुलबुल आदी पक्षी स्वच्छंदी विहार करीत आहेत.
----
मी माझ्या मित्रांच्या सोबतीने या बागेत आलो होतो. लेफ्ट. कर्नल पाटील साहेबांनी उभ्या केलेल्या कामामुळे मी भारावून गेलो आहे. मी या कामात सहभागी झालो असून निसर्गठेवा जपण्यासाठी आणि हे नंदनवन आणखी फुलविण्यासाठी या मोहिमेत काम करीत आहे. भविष्यात ही बाग भैरोबा नाल्यापर्यंत विकसित करण्याचे नियोजन केले आहे. पुणेकरांना अभिमान वाटावा असा नैसर्गिक ठेवा याठिकाणी निर्माण झाला आहे.
- वजीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नागपूर शहर, रा. पुणे
------
नदीपात्रातून जाणाऱ्या आपल्या मैलापाण्यामुळे पुढील ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना विविध आजार होत आहेत. नदीपात्रात हे पाणी जाऊ नये याकरिता नाल्याचे पाणी वळविण्यात आले. पाच तळ्यांमधून हे पाणी झाडांना देण्यात येत आहे. याठिकाणी २७ हजार झाडे लावण्यात आली. नाल्याच्या पाण्यावर ही बाग जोपासण्याचा यश आले आहे. केवळ लोकसहभागातून हें शक्य झाले आहे. नागरिकांनी आपापल्या शहरात-भागात वनराई उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. येणाऱ्या पिढीला 'ऑक्सिजन' देऊयात.
- सुरेश पाटील, लेफ्ट. कर्नल (निवृत्त), संस्थापक, ग्रीन थंब