जागतिक जैवविविधता दिन: मधमाश्यांच्या संवर्धनासाठी पुण्यात आता खास 'हनी बी हॉटेल'!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:43 PM2024-05-22T12:43:27+5:302024-05-22T12:44:04+5:30
हा उपक्रम मधमाश्यांच्या संवर्धनासाठी 'मिस्टर बी ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र जानी यांनी राबविला आहे...
- श्रीकिशन काळे
International Day for Biological Diversity| पुणे : आपल्याला वेगळ्या पदार्थांची चव चाखायची असेल, तर आपण हॉटेलमध्ये जातो. आता अशीच सोय मधमाश्यांसाठी झाली आहे. त्यांच्यासाठी खास पुण्यामध्ये ‘हनी बी हॉटेल’ची सोय करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये राहण्याची, घर करण्याची सोय करण्यात आली आहे. हा उपक्रम मधमाश्यांच्या संवर्धनासाठी 'मिस्टर बी ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र जानी यांनी राबविला आहे. जैवविविधतेमध्ये सर्वाधिक वाटा याच मधमाश्यांचा आहे. त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक आहे.
सध्या मधमाश्यांचे प्रमाण प्रचंड कमी होत आहे. कारण त्यांचा अधिवासच नष्ट होत असल्याने शहरात तर मधमाश्या दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे पुणे शहरात देवेेंद्र जानी यांनी खास ‘हनी बी हॉटेल’ सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानंतर २२ मे हा जागतिक जैवविविधता दिन असतो. त्यामुळे या दोन्ही दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने खास देवेंद्र जानी यांच्याशी संवाद साधला. यंदाची थीम ‘बी एंगेज्ड विथ यूथ’ अशी आहे.
शहरातील मधमाश्यांचे संवर्धन करणारे देवेंद्र जानी यांनी स्थानिक मधमाश्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनोखी कल्पना मांडली आहे. त्यांनी सर्वांत उंच बी हॉटेलची रचना केली आहे. मधमाश्यांचे हॉटेल हे मधमाश्यांसाठी एक प्रकारचे कीटक असणारे हॉटेल आहे, जे मधमाश्यांना विश्रांती आणि निवारा देते. मधमाश्यांची घरे उंच झाडांवर, मृत लाकडाच्या ओंडक्यावर किंवा इतर नैसर्गिक ठिकाणांवर असतात. त्यांची घरे नाहीशी होत असल्याने खास कृत्रिम, पण नैसर्गिक असे हे हॉटेल त्यांच्यासाठी वरदान ठरणारे आहे.
देवेंद्र जानी म्हणाले, मोठ्या पोळ्यांमध्ये मधमाशा राहतात, तशाच काही एकट्या मधमाश्या असतात. ज्या लाकडात किंवा चिखलाच्या बोळ्यात घरटे करून राहतात. या एकाकी मधमाश्यांमध्ये जास्त परागकण असतात. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात जुन्या झाडांचा किंवा सुक्या लाकडाचा तुटवडा आहे. त्यामुळे मधमाश्यांच्या एकांतवासासाठी, त्यांच्या विसाव्यासाठी आणि घरट्यासाठी हे हॉटेल सर्मिपत असेल."
मधमाश्यांवर उत्पादन अवलंबून-
एकाकी मधमाश्यांमध्ये लीफकटर बी, कारपेंटर बी, मेसन बी, कोकीळ मधमाशी आणि ब्लू बॅन्डेड बी यांचा समावेश होतो. जगाचा एक तृतीयांश अन्न पुरवठा मधमाश्यांवर अवलंबून आहे. कारण त्या परागीभवन करतात. मधमाश्यांशिवाय, अन्नाची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासू शकते. म्हणून त्यांचे संवर्धन गरजेचे आहे, असे देवेंद्र जानी यांनी सांगितले.
शेती क्षेत्रात कीटकनाशके, बुरशीनाशकाचा सर्रास वापर होत आहे, त्यामुळे मधमाश्यांची संख्या कमी होत आहे. नागरिक घरच्या घरी ‘बी हॉटेल’ बनवू शकतात. बांबूच्या पेंढ्यांचा गुच्छ, कागदाच्या पेंढ्यांसह बांधा आणि त्यांना हिरव्यागार जागेत लटकवा जेणेकरून ते लीफकटर मधमाश्या तिथे येतील.
- देवेंद्र जानी, 'मिस्टर बी ऑफ इंडिया'