जागतिक रक्तदाता दिन विशेष : 'ट्विटर' च्या माध्यमातून तरुणांनी उभी केली 'ब्लड फॉर पुणे' मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 07:31 AM2020-06-14T07:31:46+5:302020-06-14T07:50:35+5:30
२४ तास कार्यरत राहणारा 'बॉट' देणार जीवदान
दीपक कुलकर्णी -
पुणे : मानवी आरोग्यावर दिवसागणिक नवनवीन आजाररूपी संकटे आक्रमण करत आहे.त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात रक्ताची आवश्यकता तीव्रतेने निर्माण होऊ लागली आहे. यात वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांना प्राण गमावावे लागल्याचे देखील उदाहरणे आजूबाजूला पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत पुण्यातील काही तरुण युवकांनी जागतिक रक्तदाता ( दि.14) दिनाचे औचित्य साधत 'वुई कनेक्ट यु डोनेट' या ब्रीद वाक्यासह 'ब्लड फॉर पुणे ' या नावाने अभिनव व स्तुत्य उपक्रम राबवत मानवी आयुष्याला जीवदान देण्यासाठी एक पाऊल टाकले आहे.
सध्याच्या युगात सोशल माध्यमांपैकी 'ट्विटर' ची क्रेझ नेतेमंडळी, सेलिब्रेटी आणि आणि विशेषत: तरुणाईमध्ये प्रचंड आहे. याच धर्तीवर पुण्यातील पियुष शहा, रिषभ सुराणा या युवा मित्रांनी एकत्र येत ट्विटर वर "ब्लड फॉर पुणे " ही मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून त्यांनी ट्विटरवर 24 तास कार्यरत राहणाऱ्या एका 'बॉट' ची निर्मिती केली आहे.हा 'बॉट' 15 ते 22 सेकंदामध्ये जन्म- मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्ण किंवा त्याच्यावर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाशी जोडला जाणार आहे. तिथे रक्तदात्याचा थेट संपर्क जुळवून आणत रुग्णाला जीवदान देण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहे. अशाप्रकारे रक्तदात्यांच्या साखळी द्वारे मोफत रक्त तर उपलब्ध होणारच आहे. शिवाय योग्य ठिकाणी रक्तदान केल्याचे एक वेगळे समाधान रक्तदात्याला मिळणार आहे.'ब्लड फॉर पुणे' हा उपक्रम सुरुवातीला फक्त पुणे शहरासाठी राबविण्यात येणार आहे. पुढे सरकार, रुग्णालय, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून राज्य आणि देश पातळीवर सुरु करण्याचा तरुणाईचा मनोदय आहे.
या उपक्रमाबाबत पियुष शहा म्हणाला, आपल्याकडे रक्तदानासबंधी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून रक्तदान शिबिरे देखील घेतली जातात. मात्र तरी अत्यावश्यक काळात जेव्हा रक्ताची गरज निर्माण होते तेव्हा वेळेवर खूप अडचण येतात. परंतु , या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला रक्ताची सहज उपलब्धता करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तसेच ही रक्ताची साखळी निर्माण करताना त्यात कुणाकडून चुकीची माहिती आली किंवा कुणी फसवण्याचा प्रयत्न केला तरी त्यासंबंधी आम्हाला तात्काळ माहिती देणारी यंत्रणा विकसित केली आहे.
हा उपक्रम 'लव्ह केअर शेअर फौंडेशन'च्या अंतर्गत रिषभ सुराणा, पियुष शहा यांच्यासह मयुरेश कदम, अपूर्वा चतुर्वेदी,मिताली, प्रणव पाटील, प्रांजली दुधाळ ,राजस चौधरी,राजकुमार पाटील या मित्रांसोबत सिंहगड इन्स्टिट्यूटच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी जबाबदारी सांभाळली आहे.
पुण्यात एकूण ३४ पेक्षा जास्त ब्लड बँक असून देखील कोरोनाच्या काळात रक्ताची गरज जास्त प्रमाणात भासत आहे.रक्तदानाची गरज अधोरेखित केली आहे. याच पार्श्वभूमीवर 'ब्लड फॉर पुणे ' या उपक्रमासाठी ट्विटरचा चांगला वापर करत जास्तीत जास्त गरजवंतांपर्यंत रक्ताचं नातं निर्माण करण्याचा आमचा मानस आहे.
- रिषभ सुराणा,ब्लड फॉर पुणे