पुण्यातील येरवडा कारागृहात घडत आहेत जगज्जेते बुद्धिबळपटू; ‘चेस फाॅर फ्रीडम’मुळे नवजीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 07:50 PM2024-06-20T19:50:33+5:302024-06-20T19:53:25+5:30

गतवर्षी बुद्धिबळात जगज्जेतेपद पटकावणाऱ्या कैद्यांना चक्क जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) सदस्यांनी भेटून शाबासकी दिली आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले....

World champion chess players are taking place in Pune's Yerawada Jail; New life due to 'Chase for Freedom' | पुण्यातील येरवडा कारागृहात घडत आहेत जगज्जेते बुद्धिबळपटू; ‘चेस फाॅर फ्रीडम’मुळे नवजीवन

पुण्यातील येरवडा कारागृहात घडत आहेत जगज्जेते बुद्धिबळपटू; ‘चेस फाॅर फ्रीडम’मुळे नवजीवन

- उमेश गो. जाधव

पुणे : एकीकडे भावनेच्या भरात हातातून घडलेल्या गुन्ह्यामुळे तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आप्तस्वकीयांना पाहण्यासाठी आसुसलेले डोळे आणि दुसरीकडे याच कारागृहात घडलेल्या जगज्जेत्या बुद्धिबळपटूंचा खेळ पाहण्यासाठी आतुर विदेशी खेळाडू असे चित्र बुधवारी येरवडा कारागृहात पाहायला मिळाले. गतवर्षी बुद्धिबळात जगज्जेतेपद पटकावणाऱ्या कैद्यांना चक्क जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) सदस्यांनी भेटून शाबासकी दिली आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

‘चेस फाॅर फ्रीडम’ या उपक्रमांतर्गत जगभरातील बंदिवानांच्या पुनर्वसनासाठी बुद्धिबळाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. या खेळाडूंना ‘परिवर्तन प्रीझन टू प्राइड’ या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. फिडेच्या सामाजिक परिषदेचे सल्लागार मिखाइल कोरेनमन, फिडेच्या सामाजिक परिषदेचे आयुक्त आंद्रे वोगटिन, केंद्रीय कारागृह व सुधारगृह सेवा विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, एआयसीएफचे सचिव देव पटेल, सिद्धार्थ मयूर, निरंजन गोडबोले, ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यावेळी उपस्थित होते.

कारागृहातील संघाला प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक केतन खैरे म्हणाले की, कैद्यांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्याबाबत सुरुवातीला प्रचंड नकारात्मक विचार मनात येत होते. पण, माझा मित्र ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याच्या आग्रहामुळे मी कैद्यांना प्रशिक्षण देण्यास तयार झालो. सुरुवातीला भावनेच्या भरात गुन्हा घडलेल्या कैद्यांची निवड करून २० जणांना शिकवण्यास सुरुवात केली. नंतर असे लक्षात आले की निवडलेले सर्वच कैदी खूप समर्पित आहेत. प्रशिक्षणासाठी ते दररोज एक तास आधीच येत असत. सुरुवातीला बुद्धिबळ म्हणजे काय, येथून प्रशिक्षण सुरू केले होते. त्यांना दररोज सकाळी ११ ते २ या वेळेत प्रशिक्षण देत होतो. त्यानंतर २०२१मध्ये आम्ही स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. पण २०२२मध्ये आम्ही आशियाई स्पर्धेत रौप्य आणि जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. २०२३मध्ये या संघाने राष्ट्रीय, आशियाई आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही सुवर्णपदकासह जगज्जेतेपद पटकावले.

आयुष्य खूप सुंदर आहे; पण...!

एका बुद्धिबळपटू कैद्याने सांगितले की, जगज्जेत्या संघाचा भाग होऊ असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण बुद्धिबळामुळे आम्हाला नवजीवन मिळाले आहे. आयुष्य खूप सुंदर आहे; पण एक चूक महागात पडते.

शिक्षा होणार कमी

बुद्धिबळ खेळून जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूंची शिक्षा तीन महिन्यांनी कमी करण्यात येणार आहे. बुद्धिबळामुळेच घरच्यांना लवकर भेटता येईल हे सांगताना एका कैद्याचे डोळे पाणावले.

कारागृहातील बंदिवानांच्या पुनर्वसनासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित असतो. त्याअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या संघाने सुवर्णपदक पटकावल्यामुळे या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या कैद्यांना समाजात सन्मानाने जगता यावे एवढीच अपेक्षा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत आहोत.

- अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलिस महासंचालक

Web Title: World champion chess players are taking place in Pune's Yerawada Jail; New life due to 'Chase for Freedom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.