‘सोफिया बुक शॉप’मध्ये सामावले जग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:09 AM2018-06-18T01:09:35+5:302018-06-18T01:09:35+5:30
पुस्तकांची आवड त्यांना होती. त्यातच शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरी वाचण्यात आली.
- राहुल गायकवाड
पुणे : पुस्तकांची आवड त्यांना होती. त्यातच शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरी वाचण्यात आली. आपण जे वाचतोय, अनुभवतोय ते लोकांना सांगितलं पाहिजे, त्यांना वाचनाच्या प्रवाहात आणायला हवं हा विचार घेऊन अवघ्या १० पुस्तकांसोबत त्यांनी सुरू केलं सोफिया बुकशॉप. गेल्या २४ वर्षांपासून अडीचशे स्क्वेअर फुटांच्या जागेत सुरू असणाऱ्या या बुक शॉपमध्ये जगातील विविध भाषांमधील, शेकडो लेखकांची पुस्तके आहेत. ओशो आश्रमात येणाºया परदेशी नागरिकांच्या हक्काचं असं हे बुक शॉप असून, सोफिया यांनी जगाच्या संस्कृतींना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मूळच्या कर्नाटकच्या असणाºया सोफिया कुटुंबांसोबत १९८२ ला पुण्यात आल्या. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. त्यांनी बीएपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर काहीकाळ नोकरी केली. पंजाबी घरात लग्न झाल्याने लग्नानंतर त्यांचं नाव सोफिया ठेवण्यात आलं. त्यांच्या माहेरी तशी वाचनाची आवड कोणालाच नव्हती.
सासरीसुद्धा वाचनप्रेमी कोणी नव्हते. त्यांच्या वाचनात शिवाजी सावंतांची मृत्युंजय ही कादंबरी आली. त्यानंतर आपण जे वाचतोय, अनुभवतोय हे लोकांना सांगितले पाहिजे असे त्यांना वाटले. त्यांनी आपली नोकरी सोडून बुकशॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय त्यांच्या घरी कोणालाच आवडला नाही. त्यांनी त्यांच्या पतींच्या मदतीने कोरेगाव पार्क
येथे अवघ्या अडीचशे स्क्वेअर
फुटांची खोली या बुकशॉपसाठी मिळवली. पतीकडे असलेल्या
अवघ्या १० पुस्तकांसोबत त्यांनी १९९४ साली बुक शॉप सुरू केले. आज जगभरातील अनेक भाषांमधील शेकडो लेखकांची पुस्तके त्यांच्या शॉपमध्ये आहे.
>बुक शॉप : भेट देणारे ९० टक्के लोक परदेशी
कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमात येणारे परदेशी नागरिक हे या बुक शॉपमध्ये येणारे वाचक आहेत. या बुक शॉपला भेट देणारे ९० टक्के लोक हे परदेशी आहेत. परदेशी लोकांकडून अनेक गोष्टी शिकल्याचे सोफिया सांगतात. या सोफिया बुकशॉपची खासियत म्हणजे एखादे जुने पुस्तक येथे त्या पुस्तकाच्या २५ टक्के किमतीत खरेदी करतात. त्यांच्याकडे येणाºया विविध देशांमधील लोकांकडून त्यांना जगभरातील शेकडो पुस्तके मिळाली. परदेशी नागरिकांसाठीचं हक्काचं ठिकाण आता हे सोफिया बुक शॉप झालं आहे. या बुक शॉपमध्ये कुठेही मिळणार नाहीत अशी अनेक पुस्तके मिळतात. अनेक वर्षांनी पुन्हा भारत भेटीवर येणारे या बुक शॉपचे जुने वाचक या बुक शॉपला आवर्जुन भेट देतात. वाचकांसोबत एक ऋणानुबंध निर्माण झाल्याचे सोफिया आवर्जुन सांगतात. अनेक आॅनलाईन वेबसाइट्सवर पुस्तके मिळत असल्याने वाचकांची संख्या कमी झाली असली, तरी वाचकप्रेमी लोक या बुकशॉपमध्ये येत राहणार असा विश्वास सोफिया यांना वाटतो. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे बुकशॉप चालविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.