जागतिक प्राणी दिन विशेष , देवराई टिकली, तर टिकेल वन्यजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:31 AM2017-10-04T06:31:00+5:302017-10-04T06:31:08+5:30
देवासाठी राखून ठेवलेले वन म्हणजे ‘देवराई’ या श्रद्धेमुळे देवरायांमध्ये प्राणी, हजारो वर्षांची झाडे, औषधी वनस्पती जतन राहिल्या आहेत.
नीलेश काण्णव
घोडेगाव : देवासाठी राखून ठेवलेले वन म्हणजे ‘देवराई’ या श्रद्धेमुळे देवरायांमध्ये प्राणी, हजारो वर्षांची झाडे, औषधी वनस्पती जतन राहिल्या आहेत. देवरायांमध्ये वाढणाºया वनस्पती व प्राण्यांना इजा पोहचल्यास देवाचा कोप होतो, अशी समजूत लोकांमध्ये आहे. यामुळे माणुस आणि निसर्ग यांचे नाते टिकून आहे. या देवरायांमध्ये अनेक प्राणी, पशुपक्षी, किटकांचा अधिवास आहे. या देवरायांकडे आता दुर्लक्ष होऊ लागले असून देवराया सुरक्षीत राहिल्यास हजारो वर्षांचा ठेवा जतन राहणार आहे.
भारतात अंदाजे चौदा हजार तर महाराष्ट्रात चार हजार देवराई असल्याचे केंद्र सरकारच्या सीपीआर पर्यावरण शिक्षण केंद्राने केलेल्या पाहणी अहवालात म्हटले आहे. काही तज्ज्ञांच्या मते देशात एक लाखापेक्षाही जास्त देवराया आहेत. देशात हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत जास्त देवराया पाहायला मिळतात. कर्नाटक, उत्तराखंड, केरळ राज्यांमध्ये मोठ्या आकाराच्या देवराया आहेत. महाराष्ट्रात जास्त देवराया पश्चिम घाटातील पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.
या देवरायांच्या संरक्षणासाठी आदिवासी समाजाने काही नियम आखून ठेवले आहेत. या देवराईत कोणीही झाडे तोडू शकणार नाही, जळणासाठी लाकूड घेणार नाही, फळे तोडणार नाही, तसेच खाली पडलेली फळे-फुलेही कोणी घेणार नाही, असे नियम आहेत. आदिवासी समाजात फक्त उत्सवामध्ये जेवण तयार करण्यासाठी देवराईत पडलेली वाळलली लाकडे घेतली जातात. काही देवरार्इंमध्ये आदिवासी लोक चप्पल घालूनही जात नाहीत. देवराईतून वाहणारे पाणीही आदिवासी लोक चप्पल घालून ओलांडत नाहीत. देवराई राखून आदिवासी लोकांनी निसर्गाशी समतोल साधून घेतला आहे.
देवराईमध्ये असलेल्या मंदिरात स्थानिक देवतांचे वास्तव्य असते. हा देवच आपले रक्षण करतो, अशी आदिवासी लोकांची धारणा आहे. देवराईतील वाळलेले पान ही खाजगी वापरासाठी कोणी घेऊ शकत नाही. जर देवराईचे नियम मोडल्यास यातील देवता स्वप्नात येऊन, याचा जाब विचारतो, अशी समजूत आहे. याचा परिणाम खोलवर आहे. यामुळे निसर्गाची जपणूक साधली जात आहे.
काही देवरायांमधून स्थानिक लोकांना विशिष्ट काळात, विशिष्ट दिवशी, विशिष्ट कामासाठी वस्तु घेण्याची परवानगी आहे. थोडक्यत काही देवरार्इंमध्ये एका कुटुंबाला एकच बांबू घेण्याची परवानगी आहेत.
देवरायांच्या संरक्षणात शासनाचे लक्ष हवे
या देवरायांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासनाने लक्ष दिले पाहिजे. देवराया टिकल्या तर पुरातन काळातील झाडे, वेली येथील जैवविविधता टिकेल, यातील प्राणी, पशु, पक्षी, किटक टिकतील.
वन कायद्यांमध्येही यांच्या संरक्षणासाठी ठोस तरतूद नाही. काळाप्रमाणे या देवयारांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. स्थानिक लोकही नियम डावलून देवरायांमध्ये गुरे चरण्यासाठी सोडताना दिसतात.
देवरायांचे महत्व पटवून त्यांचे जतन करण्यासाठी या देवराया संरक्षीत ठिकाण म्हणून जाहीर केल्या पाहिजेत.