world cycle day : सायकलचं महत्त्व लाेकांपर्यंत पाेहचविण्यासाठी ते राहिले निवडणुकीला उभे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:25 PM2019-06-03T14:25:36+5:302019-06-03T14:26:42+5:30
सायकल आणि पर्यावरणाच्या प्रेमापाेटी पुणेकर अवलिया थेट लाेकसभेच्या जागेसाठी उभा राहिला हाेता. आता पुन्हा विधानसभेला देखील उभं राहण्याचा त्यांचा मानस आहे.
पुणे : सायकलचं पर्यावरणासाठी असलेलं महत्त्व, सायकलचे फायदे लाेकापर्यंत पाेहचावेत यासाठी पुण्यातील आनंद वांजपे हे लाेकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले हाेते. आता पुन्हा एकदा सायकलचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ते विधानसभेची निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहेत. पर्यावरणासाठी एकगठ्ठा मतदान झाल्याशिवाय पर्यावरणाचे महत्त्व राजकारण्यांच्या लक्षात येणार नाही असे मत त्यांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केले.
आनंद वांजपे हे पुण्याचे रहिवासी आहेत. लाेकसभेच्या निवडणुकीत ते पुणे लाेकसभेसाठी अपक्ष म्हणून उभे राहिले हाेते. यावेळी त्यांनी सायकलवरुन फिरुन घराेघरी प्रचार केला हाेता. तसेच सायकल चालविण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले हाेते. लाेकसभेला त्यांना एक हजाराहून अधिक मते मिळाली. हि मते मला नाही तर पर्यावरणासाठी मिळाल्याचे वांजपे यांचे म्हणणे आहे. कुठलिही राजकीय पार्श्वभूमी नसताना, तसेच कुठलिही ओळख नसताना हजारांहून अधिक मतं मिळणं म्हणजे लाेकांना पर्यावरणाचे महत्त्व पटत असल्याचे वांजपे यांना वाटतं. निवडणुक झाल्यानंतर अनेकांनी फाेन करुन त्यांच्या कार्याचे काैतुक केल्याचे देखील वांजपे यांनी सांगितले. खासदार व्हायची संधी मिळाली असती तर पर्यावरणासाठी माेठं काम केलं असतं असं वांजपे म्हणाले.
वांजपे गेली आठ वर्षे सायकल चालवित आहेत. पुण्यात कुठेही जायचे असेल तर ते सायकलचा वापर करतात. त्यांनी पुणे - मुंबई, पुणे- दिल्ली, पुणे - गाेवा सायकलिंग केलं आहे. सायकल चालविल्याने पर्यावरणाचं रक्षण हाेतंच तसेच शाररीक व मानसिक स्वास्थ चांगलं राहतं असं वांजपे सांगतात. वांजपे यांची जाहीरात एजंसी आहे. ते पूर्वी कारने त्यांच्या कामाच्या ठिकाणी जात असत. त्यांचे मेव्हणे आणि भावाने त्यांना सायकल गिफ्ट केली हाेती. एक दिवस त्यांचा ड्रायव्हर कामाला आला नाही म्हणून ते सहज सायकलवरुन कामाला गेले. त्यानंतर त्यांना सायकलचा प्रवास आवडू लागला. आणि गेली आठ वर्षे ते आता शहरात फिरण्यासाठी सायकलचा वापर करत आहेत. येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी देखील वांजपे उभे राहणार असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी इतर नागरिकांना देखील ते उद्युग्त करणार आहेत.