बाहुल्यांचे विश्व झाले बोलके
By admin | Published: May 10, 2017 04:22 AM2017-05-10T04:22:03+5:302017-05-10T04:22:03+5:30
कधी पोट धरून हसायला लावणारे... कधी डोळ्यात चटकन पाणी आणणारे आणि कधी हातवारे करत मध्येच एखादी गिरकी घेणाऱ्या बाहुल्यांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कधी पोट धरून हसायला लावणारे... कधी डोळ्यात चटकन पाणी आणणारे आणि कधी हातवारे करत मध्येच एखादी गिरकी घेणाऱ्या बाहुल्यांचे विश्व मंगळवारी बोलके झाले. एरवी निर्जीव असणाऱ्या बाहुल्यांनी समाजाचे वास्तव रंगमंचावर उलगडत धम्माल जगाची सैर लहान-थोरांना घडवून आणली.
संवाद पुणे व गंमत जंमत इव्हेंट्सतर्फे महाराष्ट्रातील पहिले बाहुली नाट्य संमेलन आणि प्रदर्शन कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात भरविण्यात आले आहे. यात विविध सामाजिक विषयांवरची बाहुली नाट्ये सादर झाली. या नाट्यांबरोबरच बाहुली कशी तयार करायची, याचे प्रशिक्षण घेत लहान मुलांनी बाहुलीचे वेगवेगळे प्रकार समजावून घेतले.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते या नाट्यसंमेलनाचे व प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. संवाद संस्थेचे सुनील महाजन, मकरंद टिल्लू, निकिता मोघे या वेळी उपस्थित होते.
व्यंगचित्रांना बोलता येत नाही. ती रेषेतून संवाद साधतात. मात्र, बोलक्या बाहुल्या आपल्याशी प्रत्यक्ष बोलतात. त्याचा आनंद फार वेगळा असतो. ‘डिस्नेलँड’ येण्याआधी फार पूर्वीपासून कोकणात बोलक्या बाहुल्यांचा जन्म झाला. त्या वेळी पक्षांच्या आवाजात कथा सांगितली जायची. परंतु, आता ही परंपरा मागे पडत चालली आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने अशा अनेक कलांचा ऱ्हास होत असल्याचे मंगेश तेंडुलकर यांनी सांगितले.
सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. चैत्राली माजगावकर-भांडारकर यांनी संमेलनाची रूपरेषा
सांगितली.