World Environment Day: विकासाच्या नावाखाली खूप काही घडले अन् पुण्याचे पर्यावरण बिघडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 09:35 AM2023-06-05T09:35:06+5:302023-06-05T09:40:01+5:30
पुणे शहर एकेकाळी अतिशय जैवविविधतासंपन्न होते...
- श्रीकिशन काळे
पुणे : एकेकाळी देशभरातील ब्रिटिश अधिकारीदेखील पुण्यात येऊन राहण्यासाठी प्रयत्नशील असत. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनाही निवृत्तीनंतर पुणे शहर आवडत असे. त्यामुळे पुण्याकडे सर्वांचा ओढा वाढला आणि इथले पर्यावरण बिघडले. कारण अनेक गोष्टी घडत गेल्या आणि पुणे शहर बिघडत गेले. नदी अस्वच्छ, टेकडी लचकेतोड, बांधकामे वाढली, प्राणी नामशेष, तापमान वाढले, वाहने वाढली, अशाने पुणे आता राहण्यायोग्य आहे की नाही, अशी शंका येऊ लागली आहे.
पुणे शहर एकेकाळी अतिशय जैवविविधतासंपन्न होते. त्यामध्ये दोन स्वच्छ, सुंदर मुळा-मुठा नद्या, औंधला राम नदी, याचबराेबर नागझरी व आंबील ओढा आणि स्वच्छ तलावदेखील होते; पण आज हे सर्व दूषित झाले आहे. या नद्या, ओढ्यांवर अतिक्रमण झाले आहे. तेथील जैवविविधता नष्ट झाली आहे. केवळ माणसांची लोकसंख्या वाढली आणि पुण्यातील मूलभूत सुविधांचे तीनतेरा वाजले.
ज्या नदीकाठी पुणे वसले, त्या नदीलाच गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषित करण्यात आले आहे. घराघरांत नळ आला आणि नदीवर अवलंबून असलेेले पुणेकर नदीपासून दूर गेले. नदीशी असलेली नाळ तुटली गेली. या नदीकाठी प्रचंड जैवविविधता होती. नदीत ६५ प्रकारचे मासे होते. तिच्यात पुणेकर पोहायचे. तिचे पाणी प्यायचे. आता नदीजवळ गेल्यास तिथे थांबवत नाही. कारण नदीत दररोज घराघरांतील सांडपाणी जात आहे. नदीला स्वच्छ करायचे सोडून महापालिका तिचे ब्युटीफिकेशन करत आहे. त्याने नदी स्वच्छ होणार नाही; पण नदीकाठची पाणथळ जागा, जैवविविधता नष्ट होत आहे.
टेकड्यांची झाली बेटे :
टेकड्यांनी बहरलेले पुणे अशी ओळख पूर्वी हाेती. सलग सर्व टेकड्या जोडलेल्या होत्या. त्यांची काळानुरूप बेटे बनली आहेत. कधी रस्ता तयार करण्यासाठी, तर कधी इतर गोष्टींसाठी. त्यामुळे या टेकड्यांवरील झाडे, पक्षी, प्राणी नामशेष झाली आहेत. आता काही प्रमाणात वनराई वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहे; परंतु तिथून गेलेले प्राणी परत आणता येणार नाहीत. आता केवळ माणूस हाच प्राणी या टेकड्यांवर वावरत आहे.
हे प्राणी झाले गायब :
टेकड्यांवर बिबट, काळवीट, हरिण, तरस, चौशिंगा, खोकड, लांडगा, असे प्राणी पाहायला मिळत होते. ते आता एकाही टेकडीवर राहिले नाहीत. कारण तिथे माणसांचा हस्तक्षेप वाढू लागला. परिणामी, तेथील प्राण्यांनी आपला मोर्चा हलवला. हे प्राणिजगत आता पुन्हा टेकड्यांवर येणार नाही.
पुण्याचे होतेय नागपूर :
पुण्याची गुलाबी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटत होती. ती आता राहिलीच नाही. हवामानात खूप बदल झाला आहे. पूर्वीसारखी थंडी आता पडत नाही आणि तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. त्यामुळे पुणे आता नागपूरसारखे तापत असल्याचा अनुभव येत आहे. यंदा तर कोरेगाव पार्कचे तापमान ४४ अंशावर गेले होते. यावर्षी पुणेकरांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागल्या.