जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ससून रुग्णालयाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 01:08 PM2020-10-10T13:08:39+5:302020-10-10T13:08:53+5:30
'कोपिंग स्ट्रॅटेजीज इन हेल्थकेअर वर्कर्स' हा संशोधन प्रकल्प हाती
पुणे : अचानक उदभवलेले कोरोनाचे संकट, अनिश्चितता, ड्युटी करताना येणारा ताण यामुळे डॉक्टर आणि कर्मचारी वर्गावर मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता. मानसिक स्वास्थ्याचा अभ्यास करण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातर्फे 'कोपिंग स्ट्रॅटेजीज इन हेल्थकेअर वर्कर्स' हा संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला. १०० ते १५० आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन प्रश्नावली भरून घेण्यात आली. सर्व डेटा एकत्र करून विश्लेषणासह पुढील आठवाड्यात सर्व निष्कर्ष हाती येणार आहेत.
मानसोपचार विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. निशिकांत थोरात म्हणाले, 'कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सामान्यांप्रमाणे डॉक्टर, नर्सेस यांच्यामध्येही कोरोनाची भीती होती. अचानक वाढलेले ड्युटीचे तास, दररोज वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संखया, स्वतःला कोरोना होऊ शकण्याची भीती अशा अनेक कारणांमुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत होता. सात दिवस ड्युटी आणि सात दिवस क्वारंटाईनमध्ये असल्याने कुटूंबापासून दूर रहावे लागत होते. हे बदल स्वीकारण्याची सुरुवातीला मानसिकदृष्ट्या तयारी नव्हती. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध मनुष्यबळावर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी क्वारंटाईन काळात 'स्ट्रेस मॅनेजमेंट'चे क्लास घेण्यात आले. ताण व्यवस्थापन, ध्यानधारणा, श्वासाचे व्यायाम तसेच काही उपचार यावर भर देण्यात आला. प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला.'
ससून रुग्णालयात सुरुवातीपासून कोविड उपचार आणि इतर आजारांचे उपचारही एकाच वेळी सुरू होते. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला होता. डॉक्टर आणि नर्सेसना आत्महत्येचे विचार मनात येणे, घाबरल्यासारखे वाटणे, सतत वाईट विचार येणे, झोप न लागणे अशा समस्या जाणवू लागल्या होत्या. शारीरिक आणि मानसिक लढा अविरत सुरू होता. अशा वेळी त्यांना मानसिक ताणतणाव कमी करण्याचे प्रशिक्षण दिले. गंभीर त्रास होत असल्यास औषधोपचारही देण्यात आले.
------
संशोधनातील निष्कर्ष
३० टक्के : भीती वाटणे, संवाद साधता न येणे
३० टक्के : कामामुळे येणारा ताण, चिडचिड
४० टक्के : कुटूंबापासून दूर राहण्याचा ताण, एकटेपणा
-------
उपाययोजना
१) रिलॅकसेशन टेक्निक
२) ब्रिथिंग एक्सरसाईज
३) प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅकसेशन
४) मेडिकेशन
५) मेडिटेशन
६) स्ट्रेस मॅनेजमेंट
------
मनसंवाद हेल्पलाईन
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या मनोविकृती शास्त्र विभागामार्फत ‘मनसंवाद’ नावाची सायकॉलॉजिकल हेल्पलाइन १ एप्रिलपासून सूर करण्यात आली. सहा तासांच्या ड्युटीमध्ये तीन डॉक्टर आणि समुपदेशक उपलब्ध असतात. अजूनही हेल्पलाईनवर संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येतात. सर्वसामान्य नागरिक, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी याचा लाभ घेत आहेत. या हेल्पलाइनवर अजूनही दररोज दहा ते पंधरा फोन येतात. यामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे डॉक्टर व नर्सेस यांचे प्रमाण 35 टक्के एवढे आहे.