जागतिक मातृदिन विशेष : मी 'बाई' नसले म्हणून काय झालं, 'आई' तर आहे ना !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 09:07 PM2019-05-11T21:07:11+5:302019-05-11T21:09:18+5:30
'जन्माने आपण काय व्हावं हे आपल्या हातात नसतं पण त्यापुढे कसं आयुष्य जगायचं हे मात्र आपलं आपण ठरवायचं असतं. त्यामुळे जन्माने तृतीयपंथी असले तरी माझ्या मुलीमुळे मात्र मला आई होता आलं. जगाने माझं अस्तित्व नाकारलं तरी आई नावाच्या समुदायाने मला सामावून घेतलं आणि आयुष्य सफल झालं' हे शब्द आहेत तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या बी पन्ना गाबरेल यांचे.
नेहा सराफ
पुणे : 'जन्माने आपण काय व्हावं हे आपल्या हातात नसतं पण त्यापुढे कसं आयुष्य जगायचं हे मात्र आपलं आपण ठरवायचं असतं. त्यामुळे जन्माने तृतीयपंथी असले तरी माझ्या मुलीमुळे मात्र मला आई होता आलं. जगाने माझं अस्तित्व नाकारलं तरी आई नावाच्या समुदायाने मला सामावून घेतलं आणि आयुष्य सफल झालं' हे शब्द आहेत तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या बी पन्ना गाबरेल यांचे. फक्त पन्ना नाही तर पुण्यातील अनेक तृतीयपंथी मुल दत्तक घेऊन मातृत्व अनुभवत आहेत. वस्तू घरात नेणं सोपं असतं पण चालतंबोलतं मुल म्हटलं की त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या येतात. त्यामुळे आपल्या आयुष्याची आणि समाजच्या फटकून वागण्याची झळ मुलांना बसू नये म्हणून ते विशेष प्रयत्न करतात.
याबाबत पन्ना सांगतात, 'आज मुलगी महाराष्ट्राबाहेर महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिथे मी तिला तीन महिन्यातून भेटायला जाते.ती कधीही पुण्यातील बुधवार पेठेत आलेली नाही. आपली आई तृतीयपंथी असल्याचे तिला माहिती आहे. मात्र तिने त्याविषयी कधीही उच्चार न केलेला नाही. शेवटी तिच्यासमोर माझे अस्तित्व आई म्हणून आहे हे महत्वाचे. पूर्वी तृतीयपंथीयांना मुल दत्तक दिले जात नव्हते. आता गौरी सावंत यांच्यापासून त्यालाही सुरुवात झाली आहे. मात्र आम्ही घेतलेली मुले ही अनेकदा आजूबाजूच्या वस्तीत जन्मलेली आहेत. त्यांची आई पालनपोषण न करू शकणारी तर वडील अस्तित्व नाकारणारे होते. त्यामुळे त्यांना कुठेतरी टाकून त्यांचे आयुष्य बरबाद होण्यापेक्षा अनेक हिजड्यांनी त्यांना दत्तक घेतले आहे. आमच्यापैकी काहींनी तर त्यासाठी बुधवार पेठेतून बाहेर पडून शहराच्या उपनगरात घरे घेतली आहे. या मुलांचे संगोपन सर्वसामान्य वातावरणात व्हावे असे आम्हाला वाटते.
अशोक (नाव बदललेले) यांनीही मुलगा दत्तक घेतला असून तो आता आठवीत शिकतो. ते सांगतात, 'माझा मुलगा आठवीत आहे पण मला अजूनही त्याला मी तृतीयपंथी असल्याचे सांगितलेले नाही. आजही तो मला मामा म्हणूनच हाक मारतो.मात्र आता हा मुलगाच माझं आयुष्य आहे. उद्या मी हे बाळ घेतलं नसतं तर कदाचित ते पाकीटमार किंवा दलालही बनले असते. एक नवं जग त्याला माहिती व्हावं म्हणून मी हे छोटंसं पाऊल उचललं'.
या मुलांना प्रत्यक्ष तुझी आई किंवा वडील हे तृतीयपंथी आहेत हे सांगायची वेळ येते तेव्हा मात्र अनेकांनी स्पष्ट सांगितलं. पन्ना म्हणतात, 'बाहेरून समजण्यापेक्षा आपण सांगितलेलं अधिक चांगलं. कारण कधीतरी हे सत्य समजणार आहेच. हा विचार करून मुलगी बारा वर्षाची झाल्यावर मी तिला सत्य सांगितलं आणि तिने ते स्वीकारलंही. अशोक यांचे मात्र याबाबत वेगळे मत असून योग्य वेळ आल्यावर आणि मूल पुरेसे मोठे झाल्यावर समुपदेशन करून त्याला कल्पना द्यावी. पन्ना आणि अशोक यांनी मुलाला आपलेच नाव लावले आहे. मात्र अनेक तृतीयपंथी आजही त्याला स्वतःऐवजी आपल्या वडिलांचे नाव देतात.शेवटी नावापेक्षाही नातं महत्वाचं आहे. जगाने अनेकदा द्वेष आणि अपमान दिल्यावरही आई होऊन एका कोवळ्या जीवाचं आयुष्य फुलवणाऱ्या या खरं स्त्रीत्व जपणाऱ्या तृतीयपंथीयांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.