जागतिक संग्रहालय दिन : अग्निशमन संग्रहालयात लवकरच " लाईव्ह मॉडेल शो "
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 07:00 AM2019-05-18T07:00:00+5:302019-05-18T07:00:03+5:30
अग्निशमन दलाची कार्यपद्धती, जुनी व नवी उपकरणे, आपत्तीकाळात वापरले जाणारे तंत्रज्ञान इत्यादींविषयी जनजागृती निर्माण करणे हाही एक उद्देश आहे.
पुणे : अग्निशमन दलाच्या जवान व अधिकारी यांच्या दैनंदिन जीवनातील संघर्षाचा बोलका जीवनपट मांडण्याचा प्रयत्न एरंडवणे येथील केशवराव जगताप अग्निशमन संग्रहालयात करण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे कार्य कसे चालते, हे प्रत्यक्ष अनुभवता यावे, यासाठी संग्रहालयात लवकरच लाईव्ह मॉडेल शो साकारला जाणार आहे.
एरंडवणे अग्निशमन केंद्राच्या आवारात या अग्निशमन संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. पानशेत धरण आपत्तीदरम्यान वापरलेले रोल्स-रॉस व्हिंटेज अग्निशमन यंत्र असो किंवा इतर संबंधित यंत्रे या संग्रहालयात उपलब्ध आहेत. संग्रहालयाची स्थापना १८ डिसेंबर, २०१६ रोजी झाली होती. याशिवाय, संग्रहालयाच्या स्थापनेमागे अग्निशमन दलाची कार्यपद्धती, जुनी व नवी उपकरणे, आपत्तीकाळात वापरले जाणारे तंत्रज्ञान इत्यादींविषयी जनजागृती निर्माण करणे हाही एक उद्देश आहे.
संग्रहालयात १९५६ साली दलाकडे दाखल झालेली व्हिंटेज फायर गाडी आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास ४० शाळांतील विद्यार्थी व शिक्षक दरवर्षी येथे भेट देऊन अग्नीशमन व आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक ज्ञान प्राप्त करत असतात. लॅडर, गणवेश, कटिंग टूल्स, कपलिंग, ब्रॅचेस आदींतून अग्नीशमन कार्याची माहिती नागरिकांना मिळत आहे, असे संग्रहालयातील स्टेशन आॅफिसर राजेश जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
संग्रहालयात एक छोटा तलाव, बोट, तराफा, पाण्याच्या टाकीवर बनवलेला स्टेज, छोटी बाग, अग्नीशमन साहित्यापासून बनविलेला गणपती बाप्पा, म्युरल्स, अशी आकर्षणे आहेत. या संग्रहालयात पुणे अग्निशमन दलाचा इतिहास, आग नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी विविध यंत्रे, चित्रे, मॉडेल्स आणि पॅनल्सचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. याशिवाय, संग्रहालयाला भेट देणा-या नागरिकांसाठी अग्निशमन दलाचे कामकाज दाखवण्यासाठी स्वतंत्र परिसराची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांना विविध बचावकार्यादरम्यान वापरण्यात आलेल्या शंभरहून अधिक पुरातन उपकरणे येथे पाहायला मिळतील. याशिवाय, अग्निशमन दलाचा इतिहास, कार्यपद्धती, दलातील कर्मचार्यांना आणीबाणीच्या परिस्थितीबाबतचे प्रशिक्षण याचे प्रशिक्षण दिले जाते याबाबतदेखील माहिती देण्यात आली आहे.