जगाला अहिंसा, अनेकांतवादाची आवश्यकता
By admin | Published: April 21, 2016 12:38 AM2016-04-21T00:38:36+5:302016-04-21T00:38:36+5:30
अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद या तत्त्वाची आज जगाला नितांत आवश्यकता आहे. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळविला, त्या भगवान महावीरांचे तत्त्वज्ञानच जगामध्ये शांतता प्रस्थापित करेल
पिंपरी : अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद या तत्त्वाची आज जगाला नितांत आवश्यकता आहे. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळविला, त्या भगवान महावीरांचे तत्त्वज्ञानच जगामध्ये शांतता प्रस्थापित करेल, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
महावीर जयंतीदिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने अहिंसा पुरस्काराचे वितरण व विशेष सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी शिवशाहीर पुरंदरे बोलत होते. शिवशाहीर पुरंदरे यांना ‘शिवचरित्र’ या विषयावरील देदीप्यमान कामगिरीबद्दल ‘अहिंसा पुरस्कार’ शहराचे उपमहापौर प्रभाकर वाघिरे यांच्या हस्ते देण्यात आला.
निसर्गोपचार व ग्रामीण आरोग्य या क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल डॉ. रवींद्र वसंत निसाळ (उरुळी कांचन) यांना व ‘योगा आणि आयुर्वेद’ या क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार डॉ. उमेशकुमार डोंगरे (नारायणपूर) यांना उपमहापौर वाघिरे व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आला. मांगीतुंगी येथील मूर्ती तयार करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सी. आर. पाटील यांचा विशेष सन्मान खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते, तसेच जितो कनेक्ट २०१६ या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणारे जितो महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेश सांकला व ‘जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष विजय भंडारी व स्वीकृत नगरसदस्य शरद लुणावत यांचा विशेष सन्मान पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आला.
खासदार शेट्टी यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अशोक पगारिया व प्रा. सुरेखा कटारिया यांनी केले. प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश कटारिया यांनी, स्वागत संजय जैन यांनी, तसेच आभारप्रदर्शन सतीश खाबिया यांनी केले. सदाभाऊ खोत, अण्णा बोदडे, नगरसेविका आशा सूर्यवंशी व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)