जागतिक परिचारिका दिन : वृद्धाश्रमांना जाणवतीये परिचारिकांची चणचण !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 08:35 PM2019-05-11T20:35:15+5:302019-05-11T20:38:43+5:30
मुले परदेशात आहेत. घरी सांभाळायला कुणी नाही. मुलींची लग्न झाली आहेत. एकटेपणाने ग्रासलयं. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांशिवाय पर्याय उरलेला नाही.
पुणे : मुले परदेशात आहेत. घरी सांभाळायला कुणी नाही. मुलींची लग्न झाली आहेत. एकटेपणाने ग्रासलयं. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र वृद्धाश्रमांमध्ये आजारी ज्येष्ठांकडे लक्ष देण्यासाठी परिचारिकाचं सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने ज्येष्ठांचा सांभाळ करायचा कसा? असा प्रश्न वृद्धाश्रम चालकांना भेडसावू लागला आहे. वृद्धाश्रमांना परिचारिकांची चणचण भासत असल्यामुळे परिचारिकांअभावी अंथरूणाला खिळलेल्या ज्येष्ठांना घरी पाठविण्याची वेळ येत आहे किंवा कर्मचा-यांनाच त्यांची सेवा सुश्रृषा करावी लागत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पाल्य आई-वडिलांचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शवित असल्याने वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुलींची लग्ने झाल्यामुळे किंवा सहचारी अथवा सहचारिणीचे निधन झाल्याने घरात एकटयाने राहाण्यापेक्षा अनेक ज्येष्ठांनी वृद्धाश्रमाचा मार्ग निवडला आहे. मात्र वृद्धाश्रमात ज्येष्ठांची संख्या वाढली असली तरी त्यातुलनेत त्यांचा सांभाळ करणा-या परिचारिकांचा तुटवडा भासत आहे. अनेक ज्येष्ठांना विविध आजारांनी ग्रासलेले आहे. काही अंथरूणाला खिळलेले आहेत. या अवस्थेमध्ये तीन ज्येष्ठांमागे एक तरी परिचारिका असणे आवश्यक आहे . मात्र वृद्धाश्रमांना परिचारिका मिळणचं अवघड झालं आहे. नर्सेस ब्युरोकडून किंवा रूग्णालयाकडून परिचारिकांसाठी मागणी केली जाते. मात्र ती मागणी क्वचितच पूर्ण केली जाते. यातच परिचारिकेला एका दिवसाचे हजार ते दीड हजार रूपये द्यावे लागत असल्याने ही रक्कम परवडत नसल्याचे काही वृद्धाश्रम चालकांकडून सांगण्यात आले आहे.
डॉ. श्रेया उपासनी, आजोळ वृद्धाश्रम, कात्रज :
वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी परिचारिकांची गरज भासतेच. पण त्या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अंथरूणाला खिळलेले ज्येष्ठ नागरिक आम्हाला नाकारावे लागतात.
सुमन टिळेकर, अध्यक्ष महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन :
परिचर्य संशोधन विकास संस्था स्थापन करून त्यामार्फत वृद्धाश्रम सुरू करण्याची आमची इच्छा होती. परिचारिकाच वृद्धाश्रम सांभाळतील अशी ती संकल्पना होती. मात्र आम्हाला त्यासाठी जागा मिळाली नाही. परिचारिकांची संख्याच कमी आहे. रिक्त जागा भरल्या जात नाहीत. मग कुठून पुरवठा करणार?