जागतिक अवयवदान दिन विशेष : पुण्यात तीन महिन्यांत ७ अवयवदान, १६ अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:30 PM2020-08-13T13:30:19+5:302020-08-13T13:33:46+5:30
कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवर परिणाम
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : लॉकडाऊनच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर निर्माण झालेला ताण, वाहतुकीवरील निर्बध, नागरिकांमधील भीतीचे सावट अशा विविध कारणांमुळे अवयवदानात मोठी घट झाली. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन काळात १० जणांनी अवयवदान केले. त्यापैकी पुणे विभागात ७ जणांनी अवयवदान केले. तीन महिन्यांत पुण्यात १६ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवर परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे ब्रेन डेड व्यक्तींचे प्रमाणही कमी होते. ब्रेन डेड व्यक्ती असेल तर तिच्या अवयवांचे प्रत्यारोपण कसे करायचे, याबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे. इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी आणि इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रांसप्लान्ट यांच्याकडून मार्गदर्शक तत्वे तत्वे तयार करण्यात आली. कोरोना काळातील नियमावलीचे पालन करून प्रत्यारोपण करण्यात आले.
प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी झाल्याने झेटटीसीसीकडील प्रतीक्षा यादीही वाढली आहे. सध्या मूत्रपिंडासाठी १५००, यकृतासाठी ६०० तर ह्रदयासाठी ५० नावांची प्रतीक्षा यादी आहे. कोरोना काळात एकही ह्रदयप्रत्यारोपण झाले नाही.
-------
कोरोना काळात दात्यांच्या तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. यामध्ये नाकातील, घशातील आणि ट्रकिओस्टोमी ट्यूमधील द्रावाचे नमुने घेऊन कोरोना चाचणी केली जाते. याशिवाय, छातीचा एक्सरे, सिटी स्कँन करणेही बंधनकारक असते. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रक्रियेत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करून अर्ज भरून घेतले जातात. यामध्ये रुग्णवाहिका चालक, समनव्यक, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, ऍडमिनिसत्तेतर या सर्वांचे अर्ज भरावे लागतात आणि २८ दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, याची तपासणी केली जाते. त्यांना पीपीई किट घालणे बंधनकारक असते. आरोग्य विभाग आणि नोटोतर्फे मोठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
- आरती गोखले, समन्वयक, विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती
------
अवयवदान आणि प्रत्यारोपण
महिना दाते अवयवदान
मे ३ ३ मूत्रपिंड, ३ यकृत
जून २ २ यकृत, १ मूत्रपिंड,
२ मूत्रपिंड आणि २ स्वादूपिंड
जुलै २ २ यकृत, १ मूत्रपिंड
----------
लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यांत अवयवदानाचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षी या तीन महिन्यांमध्ये ३०-३५ जणांनी अवयवदान केले होते. यावर्षी हे प्रमाण ७ पर्यंत खाली आले आहे. या काळात झालेल्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तीन प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. दात्यांकडून अवयव घेतल्यानंतर ह्रदय ४ तासांत, यकृत ९ तास, किडनी वीस-चोवीस तास, स्वादुपिंड १४-१५ तासांत प्रत्यारोपण करावे लागते.
- डॉ. गौरव चौबळ, प्रत्यारोपण विशेषज्ञ