विश्वशांती, बंधुभावाची प्रार्थना
By admin | Published: June 27, 2017 07:52 AM2017-06-27T07:52:01+5:302017-06-27T07:52:01+5:30
शिरखुम्यार्चा बेत, नवा पोशाख, गोडधोड पदार्थांची रेलचेल अन् मित्रपरिवार, आप्तस्वकीयांचा गोतावळा अशा आनंददायी
लोकमत न्यूज नेटवर्क
बावधन : शिरखुम्यार्चा बेत, नवा पोशाख, गोडधोड पदार्थांची रेलचेल अन् मित्रपरिवार, आप्तस्वकीयांचा गोतावळा अशा आनंददायी वातावरणात बावधन व कोथरूड परिसरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली़
मौलवींच्या उपस्थितीत मुस्लीम बांधवांनी पारंपरिक ईदच्या नमाजचे पठण केले. नमाजे ईदनंतर सर्व मुस्लिम बांधवांनी विश्वशांती, बंधुप्रेमासाठी प्रार्थना केली. त्यानंतर मुस्लीम बांधवांनी परस्परांची गळाभेट घेत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्यांनीही गळाभेट करून बालमित्रांना ईद मुबारक केले. घरी आलेल्या पाहुण्यांचे शिरखुर्म्याने स्वागत करण्यात येत होते. या वेळी मुस्लीम समाजातील गोरगरीब बांधवांना दान करण्यात आले. वरुणराजानेही कृपा केल्यामुळे या वर्षीच्या रमजान ईदचा उत्साह, आनंद द्विगुणित झाला होता.
सामुदायिक नमाज झाल्यानंतर बावधन प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पोलीस निरीक्षक पायल पंचभाई, शैलेश वेडेपाटील, सिझाऊल हक, इकबाल हवालदार, लिकायात शेख, रफिक शेख, फारूक शेख यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.