झोपडपट्ट्यांमधील जगणंच धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:34 AM2018-12-01T00:34:03+5:302018-12-01T00:34:11+5:30

लोकमत पाहणी : दाटीवाटीमुळे आगीच्या घटना

The world of slums is dangerous | झोपडपट्ट्यांमधील जगणंच धोकादायक

झोपडपट्ट्यांमधील जगणंच धोकादायक

Next

पुणे : मिळेल तेथे, वाटेल तशी बांधलेली घरे.... कच्चा बांधकामांवर चढवलेले मजलेच मजले... बेकायदेशीरपणे विजेच्या खाबांवर टाकलेले आकडे.... गॅस रीफीलिंग, बेकरीसारखे अनेक धोकादायक धंदे.... एका माणसाला पायी जाणेदेखील कठीण होईल या पद्धतीने सोडलेली दोन झोपट्यांमधील जागा.... चिंचोळे रस्ते.. ड्रेनेजलाईन, चेंबरवरच उभारलेली घरे... यामुळे अनेक ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाशदेखील येऊ शकत नाही... या परिस्थितीमुळे एखाद्या आजारी व्यक्तींला तातडीची मदत लागली तरी मिळणे कठीण... आशा ठिकाणी आग किंवा अन्य कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तर अग्निशामक बंब, अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचणेदेखील कठीण... अशा भयानक स्थितीत शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल ४२ टक्के म्हणजे १४ लाखांपेक्षा अधिक लोक दररोजचे आपले मरण डोळ्यांसमोर ठेवून जीवन जगत असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत दिसून आले.


शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीला बुधवारी आग लागली आणि तब्बल शंभराहून अधिक झोपड्या खाक झाल्या. झोपडपट्टीला आग लागल्यानंतर काही वेळातच ३० हून अधिक अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले; परंतु आग विझविण्यासाठी आत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना प्रचंड कसरत करावी लागली. या पार्श्वभूमीवर, शहरातील प्रमुख लोहियानगर वसाहत, मीनाताई ठाकरे वसाहत, रामनगर वसाहत व जनता वसाहत येथे जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली. यामध्ये वरील वास्तव समोर आले.

झोपडपट्टी दादांमुळे अतिक्रमण वाढते
सध्या शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. याला सर्वांधिक जबाबदार झोपडपट्टी दादा असून, आपली लीडरशिप वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक अतिक्रमण वाढविण्यास ते प्रोत्सहान देतात. यामुळे पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येतो. झोपडपट्ट्यांकडे व्हॉट बँक म्हणून पाहण्याच्या दृष्टिकोन बदलल्यास नक्कीत बदल होईल. - डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर


लोहियानगर वसाहत : लोहियानगर वसाहतीत प्रचंड दाट लोकवस्ती असून, गल्यांमधील रस्ते एकदम चिंचोळे आहेत. लोहियानगर भागात कच्च्या बांधकामावर तीन-चार मजले उभारले आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी विजेच्या तारा धोकादायक पद्धतीने घरांच्या पत्र्याला लागल्या आहेत. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा प्रचंड धोका असल्याचे निदर्शनास आले.

मीनाताई ठाकरे वसाहत
या वसाहतीत एकूण १७ मुख्य गल्ल्या आहेत. या सर्व गल्ल्यांना जोडणारा एक समांतर मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर अग्निशामक दलाची गाडी येऊ शकते. परंतु, अंतर्गत रस्ते खूपच अरुंद आहेत. काही गल्ल्यांतून दुचाकीही जाऊ शकत नाही इतक्या अरुंद आहेत, तर काही वसाहतींमध्ये लघुउद्योग तसेच विविध प्रकारची दुकाने आहेत. हे लघुउद्योग अत्यंत असुरक्षितरीत्या चालवले जात असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दुमजली, तीन मजली घरे आहेत. दुर्घटनेच्या वेळी या घरांतून ताबडतोब बाहेर पडणे अशक्य आहे. येथील लोक खूप दाटीवाटीने राहत असल्याचे दिसून आले, तसेच नागरी सुविधांचा अभाव दिसून आला.

जनता वसाहत : प्रचंड दाट लोकवस्ती, गल्ल्यांमधून एकदम चिंचोळे रस्ते, डोंगराच्या पायथ्याशी असल्याने पावसाळ्यात मोठा पाऊस झाला तर खालच्या घरांमध्ये पाणी जाते, वरील सर्व कचरा पावसाने खाली येऊन मोठ्या प्रमाणात घाण साठते, वसाहतीत एकूण १०८ गल्ल्या असून, अग्निशामक दलाची गाडी ७०व्या गल्लीपर्यंतेच जाते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास आपत्तकालीन यंत्रणाच पोहोचणे कठीण आहे.

Web Title: The world of slums is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.