जागतिक रंगभूमी दिन विशेष ; पडद्यामागील कलाकारांसाठी प्रयोगशील नाटय कलावंतांचा मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 09:58 AM2020-03-27T09:58:20+5:302020-03-27T10:00:09+5:30
करोना विषाणूच्या संकटामुळे हातावरचे पोट असलेल्या पडद्यामागच्या कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असताना त्यांच्या मदतीसाठी पुण्यातील प्रयोगशील नाटय कलावंत मंडळी पुढे सरसावले आहेत.
पुणे ; करोना विषाणूच्या संकटामुळे हातावरचे पोट असलेल्या पडद्यामागच्या कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असताना त्यांच्या मदतीसाठी पुण्यातील प्रयोगशील नाटय कलावंत मंडळी पुढे सरसावले आहेत. नाट्य संस्था आणि प्रयोगशील कलाकारांनी एकमेकांशी संपर्क करून दोन दिवसात दीड लाख रुपयांचा निधी उभा केला आहे. उद्या (27 मार्च) रंगभूमी सेवक संघाच्या माध्यमातून ४१ बॅकस्टेज कलाकारांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.
पडद्यामागच्या कलाकारांना किमान एक महिन्याचा किराणा माल विकत घेता यावा आणि कोणी उपाशी राहू नये, अशी रंगभूमीवरील कलाकारांची तळमळीची भावना आहे. 'पडद्यामागील कलाकारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होऊ नयेत, ही काळजी घेणे आम्हा कलावंतांचे कर्तव्य आहे. या भावनेतून आसक्त, नाटक कंपनी, आजकल, थिएट्रॉन आणि नाटकघर, पुणे या संस्था आणि संस्थेशी संबंधित स्त्री-पुरुष लेखक, अभिनेते, दिग्दर्शक या कलाकारांनी एकमेकाशी संपर्क करून दोन दिवसात दीड लाख रुपयांचा निधी जमा केला आणि रंगभूमी सेवक संघ या संस्थेकडे सुपूर्द केला आहे. पुण्यातील ४१ बॅकस्टेज कलाकारांना प्रत्येकी ३ हजार ६६० रुपये जागतिक रंगभूमी दिवसाचे महत्त्व मनात ठेवून दिले जातील. या कलाकारांच्या कुटुंबाला एक महिना पुरेल इतका जीवनावश्यक शिधा विकत घेता येईल, ही त्या मागची कल्पना आहे. ही रक्कम संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले प्रत्येक कलाकारापर्यंत पोहचवतील,' असे एका प्रयोगशील दिग्दर्शकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
भयप्रद शांततेने प्रत्येकाचे मन काळवंडले गेले आहे. अनेक विषाणूंचे खेळ जागतिक रंगभूमीने पाहिले आहेत आणि त्यावर पडदा टाकून नवनिर्मितीची घंटाही तिने वाजवली आहे. या आत्मविश्वासाने सध्याच्या विपरीत दृश्यात एक छोटा हातभार लावायचा म्हणून रंगभूमीवरील बॅकस्टेज कलाकारांना मदतीचा हात दिला आहे. ही मदत अल्प आहे याची जाणीव आहे. एकत्र येण्याच्या या साध्या कृतीतून सर्वांची दिसलेली एकजूट आणि रंगभूमी कलाकाराचे एकमेकांप्रति असलेले ममत्त्व हे महत्त्वाचे आहे
-प्रयोगशील कलाकारांची भावना