जागतिक दृष्टिदानदिन : मरावे परी ‘नेत्र’रूपी उरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 02:19 AM2018-06-10T02:19:53+5:302018-06-10T02:19:53+5:30
बदलत्या गतिमान काळात अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती पुरेशा प्रमाणात असताना दुसऱ्या बाजुला नेत्रदानाविषयी मात्र गैरसमज असल्याचे दिसून येते. इतर अवयवदानाच्या तुलनेत नेत्रदान सोपे असले तरीदेखील वर्षाकाठी नेत्रदानाची आकडेवारी तीन अंकांच्या घरात आहे.
पुणे - बदलत्या गतिमान काळात अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती पुरेशा प्रमाणात असताना दुसऱ्या बाजुला नेत्रदानाविषयी मात्र गैरसमज असल्याचे दिसून येते. इतर अवयवदानाच्या तुलनेत नेत्रदान सोपे असले तरीदेखील वर्षाकाठी नेत्रदानाची आकडेवारी तीन अंकांच्या घरात आहे. शहरातील खासगी नेत्ररुग्णालयात दरवर्षी होणारे नेत्रदान १०० च्या जवळपास आहे.
जागतिक नेत्रदानादिनाच्या निमित्ताने नेत्रदान एनआययूचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, १९९४ साली सुरू झालेल्या एनआययूच्या २४ वर्षांच्या कालखंडातील नेत्रदानाची आकडेवारी पाहिल्यास त्यावरून समाजात अद्यापही नेत्रदानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती केवळ भारतातच आहे, असे नव्हे तर परदेशातदेखील नेत्रदान करणाºयांची संख्या कमीच आहे. मात्र, तिकडे त्यावर संशोधन होत असून आता तर थ्रीडी प्रिटिंग टेक्नोलॉजीने आर्टिफिशियल प्रिंटच्या माध्यमातून कृत्रिम बुबुळ तयार करण्यात येणार आहे, असे तंत्रज्ञान परदेशात विकसित झाले आहे. आपल्याकडे ते यायला थोडा अवधी जाईल. परंतु, मोठ्या संख्येने नेत्रदानाविषयीची जनजागृती वाढण्याकरिता सरकारी माध्यमांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपल्या देशात अवयवदान करताना भावनिकता आडवी येते. एखाद्यावेळी ही भावनिकता इतक्या टोकाची होते, की रुग्णालयात आलेल्या पेशंटला वस्तुस्थितीची कल्पना करून द्यावी लागते. चित्रपटाचा प्रभाव डोक्यात घेऊन त्यानुसार शस्त्रक्रिया करून आपल्या नातेवाईकाला डोळे देण्याची त्यांची कल्पना वेगळी असते. भारताचा नेत्रदानासंबंधी इतर देशाशी तुलनात्मक अभ्यास केला असता आशिया खंडातील श्रीलंका देशात नेत्रदानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामागील कारणांचा शोध घ्यायचा झाल्यास त्या देशांत नेत्रदानाबद्दलची जनजागृती असे सांगता येईल. काही विशिष्ट आजारांबाबत एखाद्या व्यक्तीला नेत्रदान करण्याची इच्छा असेल तरीदेखील त्या व्यक्तीचे डोळे दुसºया व्यक्तीसाठी वापरता येत नाही. रेबीज, एचआयव्ही, हिपॅटायटीस, सेप्टिसेमिया यांसारख्या आजारांमधील व्यक्तीचे डोळे घेता येत नाहीत.
काय करावे?
व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीचे नेत्रदान करायचे झाल्यास त्वरित जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधावा.
संबंधित मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर ओल्या कापडाच्या घड्या ठेवाव्यात. त्या व्यक्तीला ज्या घरात ठेवले असेल त्या घरातील पंखे बंद करावेत.
व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र तयार करून घ्यावे. जेणेकरून व्यक्तीच्या मृत्यूचे कारण लक्षात घेऊन नेत्रदानाचा निर्णय घेण्यास मदत होईल.
समज / गैरसमज
आपल्याकडे अद्याप पुनर्जन्म याविषयीच्या कथा अस्तित्वात असून एखाद्याने डोळे दान करण्याचा निर्णय घेतला तर पुढच्या जन्मी डोळे मिळणार नाही, अशी अंधश्रद्धा अनेकांच्या मनात आहे.
नेत्रदान केल्यानंतर शरीर विचित्र दिसेल. वास्तविक मृत व्यक्तीने नेत्रदान केल्यानंतर शरीर चांगले अथवा वाईट दिसण्याचा प्रश्न नसून ती मृताच्या नातेवाईकांची भावना असते.
नेत्रदानाची प्रक्रिया खूपच वेळखाऊ आणि किचकट स्वरूपाची असून ते करण्यअगोदर खूपच कायदेशीर बाबींकडे लक्ष द्यावे लागते.
मृत्यूपत्रात नेत्रदानाची आगाऊ नोंद करावी लागते. असा एक समज नेत्रदात्याचा असतो.
खर्चिक प्रक्रिया आहे.