"G20 द्वारे नरेंद्र मोदी जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 08:45 AM2022-12-09T08:45:34+5:302022-12-09T08:48:01+5:30

सहमतीतून समस्या सोडवण्याचा मार्ग नरेंद्र मोदी जगाला दाखवतील, असा विश्वास भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला...

World will get to know Indian culture from G20 - Vinay Sahasrabuddhe | "G20 द्वारे नरेंद्र मोदी जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतील"

"G20 द्वारे नरेंद्र मोदी जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतील"

Next

पुणे : जी-२० चे अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतील. याआधीचे विकसित राष्ट्रांनी पर्यावरणाला धोका निर्माण करायचा आणि हे नुकसान इतर देशांनी भरून काढायचे हे धोरण यापुढे चालणार नाही. सहमतीतून समस्या सोडवण्याचा मार्ग नरेंद्र मोदी जगाला दाखवतील, असा विश्वास भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी जी-२० परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर भारतात होणाऱ्या या परिषदेबाबत केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या नियोजनाची माहिती सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, कोरोनाची साथ, रशिया युक्रेन युद्ध, हवामानातील बदल यामुळे जगभरात गोंधळ सुरू झाला आहे. विकसित देश विकसनशील देशांवर नको ते नियम लादू पाहत आहेत. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी नैसर्गिक स्त्रोतांवर सर्वांची समान मालकी आणि ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या सूत्रानुसार, लोकशाहीची मातृभूमी असलेल्या भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम् या सांस्कृतिक मूल्याची ओळख जगाला करून देतील.

‘युद्धाला नकार आणि शांततेचा पुरस्कार’ ही पंतप्रधानांची भूमिका या परिषदेच्या सदस्य राष्ट्रांनी स्वीकारली असून त्यासाठी जागतिक पातळीवर जनमत उभे केले जाईल, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. जी- २० परिषदेचे २० देश सदस्य असले तरी भारताने स्पेन, नेदरलँड, इजिप्त, बांगलादेश, ओमान यासह इतर देशांनाही पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. एकूण ४३ देशांचे प्रतिनिधी पुढील वर्षभरात भारतात येणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर, पुणे येथेही बैठका होतील अशी माहिती सहस्रबुद्धे यांनी दिली.

काँग्रेस छोडो भारत जोडो

भारतीय जनता पक्षाला प्रत्येक निवडणुकीत यश मिळते आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांना भारतीय जनतेकडून मिळणारा हा पाठिंबा आहे. काँग्रेस छोडो, भारत जोडो हेच हे निकाल दाखवून देतात असा टोला सहस्रबुद्धे यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे नाव न घेता मारला.

Web Title: World will get to know Indian culture from G20 - Vinay Sahasrabuddhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.