जागतिक महिला दिन: फरासखाना वाहतूक विभागाची जबाबदारी आता कायमस्वरूपी महिलांच्या खांद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 08:00 AM2020-03-08T08:00:00+5:302020-03-08T08:00:07+5:30
सर्वात महत्त्वाचा व शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक विभागात महिलांकडे
पुणे : महिला दिनानिमित्त पुणे शहरातील वाहतूक शाखेचा फरासखाना वाहतूक विभाग महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत रविवारपासून संचलित करण्यात येणार आहे. ही योजना कायमस्वरुपी असणार आहे, अशी घोषणा वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केली आहे.
वाहतूक शाखेच्या पुणे पोलीस आयुक्तालयात २२ विभाग आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा व शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक विभाग महिलांकडे सोपविण्यात आला आहे.
याबाबत डॉ़ संजय शिंदे यांनी सांगितले, फरासखाना वाहतूक विभागाच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक स्वाती थोरात असणार असून त्यांच्याबरोबर सहायक पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस उपनिरीक्षक के. व्ही. म्हस्के, तसेच ३० महिला पोलीस कर्मचारी असणार आहेत. शहराच्या मध्यवस्तीतील वाहतूकविषयक सर्व निर्णय व वाहतुकीचे नियोजन या महिला अतिशय सक्षमपणे पाहतील. हा निर्णय कायमस्वरुपी घेण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक स्वाती थोरात या सध्या वारजे वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक, भरोसा सेल तसेच ज्येष्ठ नागरिक कक्षाचे काम यांनी यापूर्वी पाहिले आहे. त्यांची ६ जानेवारी २०२० रोजी वारजे वाहतूक विभागात बदली झाली होती.
नव्या कामाविषयी स्वाती थोरात यांनी सांगितले, की सध्या वारजे वाहतूक विभागात काम पाहत आहे. तेथे पुरुष अधिकारी व कर्मचारी समवेत आहेत. मध्यवस्तीतील फरासखाना वाहतूक विभाग हा नेहमीच २४ तास वाहनांची वर्दळ असलेला विभाग आहे. तेथील काम आव्हानात्मक असते़ सर्व महिलांना बरोबर घेऊन येथे घडी बसवावी लागेल.