जागतिक महिला दिन विशेष : साहित्य प्रकारांतील ‘या ’ प्रांतात महिलांची वानवा का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 07:00 AM2020-03-08T07:00:00+5:302020-03-08T07:00:07+5:30

कथा, कादंबरी, काव्य, गझल, बालसाहित्य आदी प्रकारांत महिलांनी दिलेले योगदान उल्लेखनीय...मात्र,

World Women Day special : Why do women number less in 'this' types of literature? | जागतिक महिला दिन विशेष : साहित्य प्रकारांतील ‘या ’ प्रांतात महिलांची वानवा का? 

जागतिक महिला दिन विशेष : साहित्य प्रकारांतील ‘या ’ प्रांतात महिलांची वानवा का? 

Next
ठळक मुद्देपूर्वीपासूनच पुरुषांइतके व्यासपीठ, स्वातंत्र्य महिलांच्या वाट्याला कमी प्रमाणात ललित लेखन किंवा भावनाप्रधान विषय मांडताना तुलनेत तितक्या अभ्यासाची नसते आवश्यकता

दीपक कुलकर्णी -
पुणे : पुरुषी वर्चस्ववादी परंपरेची चौकट मोडून महिलांनी आजमिताला वैविध्यपूर्ण क्षेत्रात यशाची नवनवीन शिखिरे काबीज केली आहे. त्यात शिक्षण, कला, क्रीडा, नोकरी, व्यवसाय यांसोबतच साहित्य क्षेत्राचा समावेश होतो. साहित्य विश्वात कथा, कादंबरी, काव्य, गझल, बालसाहित्य आदी प्रकारांत महिलांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. मात्र, ऐतिहासिक, विज्ञानकथा, रहस्य, किंवा विनोदी असे साहित्यप्रकार हाताळण्यामध्ये महिलांचे प्रमाण अगदी बोटावर मोजण्याइतपत आहे. नेमके हे साहित्य प्रकार स्त्री लेखिकांकडून उपेक्षित राहण्यापाठीमागचे वास्तव काय असा सवाल उपस्थित होतो. 
जागतिक महिला दिनानिमित्त (दि. ८ मार्च ) ‘लोकमत’ने या साहित्य विश्वातील मान्यवर महिलांशी साधलेल्या संवादातून टाकलेला प्रकाशझोत. 
मराठी साहित्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला कार्यरत आहे. त्यांनी इतर भाषेतील साहित्याचे अनुवाद सुध्दा तितक्यात हिरीरीने केले आहे. हे साहित्य प्रकार हाताळताना स्त्रीवादी चळवळीला न्याय देण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे. पण साहित्य विश्वातील ऐतिहासिक, वैज्ञानिक, व रहस्य प्रकार हाताळणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी जाणवते. 
याविषयी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, आपल्या इतिहासामध्ये पुरुषी वर्चस्ववाद पाहायला मिळतो. त्यात स्त्रीला मिळालेली दुय्यम वागणूक, तिच्यावर झालेले अत्याचार असे कटू अनुभव पदरी आहे. त्यात इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आता कुठेतरी स्त्री- पुरुष समानतेचा धागा गुंफण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमानावर आधारित लेखनावर स्त्रिया जास्त भर देतात. त्या आपल्या भावना कथा, काव्य, कादंबरी यांच्या माध्यमातून व्यक्त होतात. त्याउलट विज्ञान, रहस्य, इतिहास या साहित्य प्रकारांमध्ये अभ्यास, संशोधन फार महत्वाचे ठरते. आणि कुटुंब व्यवस्था, नोकरीच्या धावपळीत लेखनासाठी तितकासा वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे कदाचित हे साहित्य प्रकार महिलांकडून दुर्लक्षित राहिले.    
     किशोर मासिकाच्या माजी संपादिका व ज्येष्ठ लेखिका ज्ञानदा नाईक म्हणाल्या, ऐतिहासिक, विज्ञान, रहस्य या विषयांत लेखन करताना महिला अभावानेच दिसतात. कारण त्या क्षेत्रातले लेखन तसे सोपे नाही. त्यासाठी वाचन, संशोधन यांच्या अभिरुचीसोबतच चिंतन, संयम,मनन यांची बैठक लागते. तसेच पुरेसा वेळ देणेही गरजेचे असते. मात्र, ललित लेखन किंवा भावनाप्रधान विषय मांडताना तुलनेत तितक्या अभ्यासाची आवश्यकता नसते. मुळातच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे मराठी साहित्यात काव्य, कादंबरी, कथा यांच्या तुलनेत विज्ञान, रहस्य किंवा ऐतिहासिक साहित्य निर्मितीचे प्रमाणच नगण्य आहे. मात्र, नवीन पिढी महिला ही कमतरता भरुन काढेल याची खात्री वाटते.कारण त्यांची दुर्लक्षित बाबींमध्ये काम करण्यासाठीची धडपड, नवनिर्मितीची ओढ ही वाखाण्ण्याजोगी आहे.  
..............
मराठी साहित्यात स्त्रियांचे योगदान जसे नाकारता येत नाही तसे काही साहित्य प्रकार हाताळण्यात त्यांचे प्रमाण कमी आहे हे वास्तव देखील विसरुन चालणार नाही. स्त्री पुरुष समानता समाजात रुजत असली तरी कौटुंबिक पार्श्वभूमीवर लहानपणापासून जोपासले जाणारे स्त्री- पुरुष यांच्यातले काही गोष्टीतले बेसिक फरक ऐतिहासिक, विज्ञान, रहस्य यांसारख्या साहित्य प्रकारात लेखन करताना महिलांन अडथळे ठरतात. पूर्वीपासूनच पुरुषांइतके व्यासपीठ, स्वातंत्र्य महिलांच्या वाट्याला कमी प्रमाणात आले आहे. देवयानी अभ्यंकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन 

Web Title: World Women Day special : Why do women number less in 'this' types of literature?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.