जागतिक महिला दिन विशेष : ‘ कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी’; येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाचा राज्यात ठसा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 07:00 AM2020-03-08T07:00:00+5:302020-03-08T07:00:09+5:30
शेती उत्पादनात येरवडा महिला मध्यवर्ती कारागृह राज्यात अव्वल
युगंधर ताजणे -
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीवान महिलांनी पुरुष बंदीवानांपेक्षा वरचढ कामगिरी करून शेतीच्या उत्पादनात अव्वल कामगिरी बजावली आहे. या बंदीवान महिलांनीशेती उत्पादनातून येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाला ३१ लाख ३८ हजारांचे उत्पन्न मिळवून राज्यात वेगळा ठसा उमटविला आहे.
येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाचे शेतीकरिता १७ एकरांचे क्षेत्र आहे. पाण्यासाठी विहीर आहे. नियोजित बैठकीत ठरल्याप्रमाणे कुठल्या वेळी कोणते पीक घ्यायचे, त्यासाठी आवश्यक ती खते, बी-बियाणे यांची खरेदी करायची याचा निर्णय प्रशासकीय विभाग घेते. त्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. येरवडा तुरुंगाचे अधीक्षक यू. टी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र दाभाडे हे कृषी पर्यवेक्षक, तर विजय वाघमोरे हे सहायक कृषी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
येरवडा महिला कारागृहात एकूण २९५ महिला बंदी आहेत, २२ लहान मुलांचा समावेश आहे. सध्या ४० महिला बंदी शेतकरी म्हणून काम करतात. त्यांचे अर्धकुशल, कुशल असे वर्गीकरण करण्यात आले असून खुरपणी, नांगरणी, फवारणी ही कामे अर्धकुशल महिलांकडे, तर रोपांची देखभाल, बी-पेरणी, कापणी, तोडणी यांसारखी कामे कुशल महिला बंद्यांना दिली गेली आहेत. येरवडा महिला तुरुंगाच्या अधीक्षक एस. एस. पवार म्हणाल्या, की २५ ते ५५ वयोगटांतील बंदी महिला शेती करतात. सतत चार भिंतींच्या आत असणाºया बंदी शेतात काम करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना मनस्वी आनंद होतो. त्या मनापासून काम करतात. त्यांना याठिकाणी मोकळे वातावरण मिळते. शेतीचे काम केल्यास एका महिन्याला एका महिन्याची शिक्षा माफ असल्याने अनेक बंदी महिला त्याचा लाभ घेतात. बंदीवान महिला प्रामुख्याने भाजीपाला, कलिंगडासारखी हंगामी फळे पिकवतात.
* बंदीवान महिला शेतकऱ्यांचे काम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी म्हणावे लागेल. राज्यातील इतर मध्यवर्ती व खुल्या कारागृहाच्या तुलनेत येरवडा मध्यवर्ती कारागृह उत्पन्न, उत्पादन, सतत नवनवीन प्रयोग यात अग्रेसर आहे. याचे श्रेय त्या बंदीवान महिलांना द्यावे लागेल. आता शासनाकडून ग्रीन शेड नेटसाठी ४ लाख ९८ हजार रुपये मंजूर झाले असून, त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर बंदी महिलांना त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ देण्याचे काम शेतीच्या निमित्ताने केले जाते. - यु. टी. पवार ( अधीक्षक - येरवडा मध्यवर्ती कारागृह)
- अशी चालते बंदीवान महिलांची शेती
- अर्धकुशल बंदी महिला शेतकऱ्यांना दिवसाला ५५, तर कुशल बंदी महिला शेतकऱ्यांना ६१ रुपयांचा रोज मिळतो.
- सकाळी साडेआठ वाजता काम सुरु होते. दुपारी एक वाजता शेतातच महिलांना जेवण, त्यानंतर चार वाजेपर्यंत काम सुरू राहते. शासकीय सुट्यांनुसार कामाला सुटी असते.
- साधारण तीन ते चार दिवसांकाठी ६०० ते ८०० किलो भाजीपाला दोन्ही तुरुंगाला पुरवला जातो. शेतीसाठी पाच बैल आहेत.
- कारागृह परिसरात १४३ चिंचेची झाडे असून, त्यातून बंदीवान महिलांनी कारागृह प्रशासनाला ३ लाख १७ हजारांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.