जागतिक कुस्तीसाठी पौडची तनुजा
By admin | Published: September 1, 2015 03:50 AM2015-09-01T03:50:44+5:302015-09-01T03:50:44+5:30
लवळे (ता. मुळशी) येथील तनुजा आल्हाट या विद्यार्थिनीची पाचव्या जागतिक सिरम चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. म्यानमार येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतातून
पौड : लवळे (ता. मुळशी) येथील तनुजा आल्हाट या विद्यार्थिनीची पाचव्या जागतिक सिरम चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. म्यानमार येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतातून ९ खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश आहे. तनुजा पुणे जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे.
सामान्य कुटुंबातील तनुजाचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण लवळे-राऊतवाडीला झाले. तनुजा चौथीत असताना नामांकित मल्ल व प्रशिक्षक दिनेश गुंड यांची मुलगी कुस्तीसाठी लवळेच्या यात्रेत आली होती. तिचे
कुस्तीतील कसब पाहून भारावलेल्या तनुजाने कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याचा हट्ट वडिलांकडे धरला. वडिलांनीही प्रपंचाची काटकसर करीत तनुजाला कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली.
शिक्षणाबरोबर खास कुस्तीचेही धडे मिळावेत यासाठी तिच्या वडिलांनी तिला आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालयात दाखल केले. त्याच ठिकाणी ती जोग महाराजांच्या व्यायामशाळेत राहू लागली. शिक्षणाची पाटी गिरवता गिरवता तनुजा आळंदीत कुस्तीच्या आखाड्यातही कर्तबगारी गाजवू लागली. प्रशिक्षक दिनेश गुंड यांनी कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तनुजाला दिले. त्यांनी दररोज तिच्याकडून कसून सराव करून घेऊन कुस्तीचे चितपटाचे अनेक डाव शिकविले. त्याचा सराव करून तनुजाही पारंगत झाली. राज्यातून तीन तर देशातून नऊ खेळाडू या स्पर्धेसाठी म्यानमारला जाणार आहेत. (वार्ताहर)