#Worldphotographyday : मान्यवरांसाेबत छायाचित्रे काढून त्यांनी केला विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 03:37 PM2019-08-19T15:37:38+5:302019-08-19T15:40:40+5:30
तब्बल 1400 मान्यवरांसाेबत फाेटाे काढून पुण्यातील दीपक बुंदेले यांनी एक वेगळाच विक्रम केला आहे.
पुणे : सर्वसामान्यपणे माणूस एका विशिष्ट चौकटीतच जगत असतो. आयुष्यातील धावपळीचा, स्पर्धेचा सामना करताना अनेकदा आपल्या आवडीनिवडी, छंद मागे पडतात. दीपक बुंदेले यांनी छायाचित्रणाचा आपला छंद अशाच प्रकारे जपला आहे. राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना भेटून त्यांच्यासह छायाचित्र काढून घेण्याच्या त्यांच्या उपक्रमाची नोंद इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. आजवर त्यांच्यालडे ७४०० छायाचित्रांचा संग्रह जमा झाला आहे.
बुंदेले यांनी साधारणपणे वीस वर्षांपूर्वी वर्तमानपत्रातून पत्रलेखनाला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने राजकीय,सामाजिक, क्रीडा व मनोरंजनात्मक लेखन केले. लिखाण सुरु असतानाच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना आणि अभिनेत्यांना भेटण्याचा दीपक ह्यांना छंदच जडला. राजकारणातील, समाजकारणातील व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू, गायक, संगीतकार अशा सुमारे 1400 व्यक्तीना ते आजपर्यंत प्रत्यक्ष भेटले. त्यांच्या सह्यांचा आणि छायाचित्रांचा संग्रह आजमितीस 7400 पर्यंत पोहोचला आहे. ते त्या व्यक्तीला कधी, कोठे, कोणत्या वेळी भेटले ह्यांची सविस्तर टिपणेही करुन ठेवली आहेत.
दीपक बुंदेले यांचे या संग्रहाबद्दल तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुषमा स्वराज, अभिनेता मिथुन चक्रवर्ती, माधुरी दीक्षित यांनीही कौतुक केले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद झाली आहे. माजी राष्ट्रपती ए. पी.जे. अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील, मा. पंतप्रधान एच. डी. देवेगौड़ा, स्वामी रामदेवबाबा, अण्णा हजारे, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, माधुरी दीक्षीत, कपिल देव, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी अशा हजारो मान्यवरांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांच्यासोबत छायाचित्र घेतले आहे.
ते म्हणाले, ‘सुषमा स्वराज, उद्धव ठाकरे ह्यांनी खास वेळ देऊन माझा संपूर्ण संग्रह बघितला आणि कौतुक केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष दखल घेत पत्राद्वारे कौतुक केले. अभिनेता मिथुन चक्रवर्ती व अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत घेतलेले छायाचित्र त्यांना आवडल्याने त्यांनी माझ्याकडून छायाचित्रांची प्रत मागून घेतली व आभार व्यक्त केले.’