जागतिक ज्येष्ठदिन : कोणी तरी बोला रे आमच्याशी थोडं...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 01:13 AM2018-10-01T01:13:23+5:302018-10-01T06:44:39+5:30

वृद्धांची आर्त हाक; कुटुंबातील संवाद हरवतोय

World's old age people Day: Say something to us a little bit ... | जागतिक ज्येष्ठदिन : कोणी तरी बोला रे आमच्याशी थोडं...

जागतिक ज्येष्ठदिन : कोणी तरी बोला रे आमच्याशी थोडं...

googlenewsNext

पुणे : नटसम्राट सिनेमातील नाना पाटेकर यांचा कोणी घर देत का घर, हा डायलॉग घरातील वृद्धांची स्थिती दाखवत असल्याचे अत्यंत दुर्दैवी उदाहरण आहे. मुलांनी घराबाहेर काढल्यानंतर सिनेमात नाना पाटेकर यांच्यावर दारोदार फिरण्याची वेळ आली. मात्र प्रत्यक्ष समाजात काहींनी आई-वडिलांना घराबाहेर काढले नसले तरी त्यांच्याबरोबर कोणी संवादच साधत नसल्याने आमच्याबरोबर कोणी बोलता का रे थोडं, अशी विनवणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आज जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या भावना समजावण्याचा हा प्रयत्न आहे.

ज्येष्ठ माणसे घरात नकोच, अशी मानसिकता शहरातील नोकरदारांमध्ये वाढली आहे. त्यामुळे वृद्धांना विविध प्रकारे त्रास देऊन गावाकडे जाण्याचा इशारा मुलगा किंवा सुनेकडून दिला जातो. त्यातून वाद झाल्यास कित्येक महिने वृद्धांबरोबर संवादच साधला जात नाही. तर काही परिस्थितींमध्ये घरातील सर्व व्यक्ती नोकरीला असतात. त्यामुळे त्याचा सकाळचा वेळ घरातील काम आवरण्यात, दिवसभर आॅफिसला आणि रात्री घरी आल्यानंतर टीव्ही पाहण्यातच जातो. तर घरातील लहान मुले गेम खेळण्यात किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर गप्पा मारण्यात दंग असतात. त्यामुळे वृद्धांबरोबर बोलण्यासाठी कोणीच नसते. त्यात जर घरात एकच वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना दिवस कसा घालवायचा, अशा प्रश्न रोजच पडतो. वृद्धांचे हे प्रश्न मिटविण्यासाठी राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून प्रत्येक जिल्ह्यात ‘वी आर नॉट अलोन’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे ज्येष्ठ नागरिक संघटनांना एकत्र करून त्याद्वारे वृद्धांचे प्रश्न मिटविण्यात येणार आहे. समस्यांच्या गर्तेत सापडलेल्यांना प्राधिकरणाकडून समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी येणारे नागरिकदेखील काही उपाययोजना सुचवत असून त्या अवलंबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक सचिन राऊत यांनी दिली.

आमच्याबरोबर बोलण्यासाठी कोणीच नाही. आम्ही तुम्हाला घरचा पत्ता देतो. कोणाला तरी आमच्याबरोबर बोलण्यासाठी पाठवता का, अशी विनवणी करणारे फोन येत आहेत. त्यानुसार आम्ही त्वरित एखादा स्वयंसेवक त्यांच्या घरी पाठवतो. त्यामुळे त्यांनादेखील बरे वाटते. संबंधित स्वयंसेवक त्यांचे समुपदेशनदेखील करीत असतात. ज्येष्ठांकडे खूप अनुभव असतो, असे राऊत यांनी सांगितले.

आरोग्याची समस्या गंभीर
वयाबरोबर आजारही वाढत असतात. त्यामुळे समुपदेशनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये आरोग्याची समस्या गंभीर असल्याचे जाणवते. त्यातील काहींकडे तर दैनंदिन गोळ्या-औषधांसाठीदेखील पैसे नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आरोग्याच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात काम होण्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले.
ज्येष्ठांच्या धोरणात बदल सुचवणार
ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने धोरण तयार केले आहे. मात्र त्यात काही त्रुटी आहेत. त्यामुळे त्यात काही बदल करण्यासाठी ज्येष्ठांविषयी काम करणाºया काही तज्ज्ञ व्यक्ती एकत्र येऊन काम करीत आहेत. ज्येष्ठांना अपेक्षित असलेल्या बदलांचा आराखडा लवकरच केला जाईल.

Web Title: World's old age people Day: Say something to us a little bit ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे