सोलापूर रस्त्यावरील सायकल ट्रॅकची बिकट ‘वाट’; पदपथावरून चालताना पादचारीही त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:54 PM2018-01-20T13:54:48+5:302018-01-20T13:57:00+5:30

सोलापूर रस्त्यावर पुलगेट ते हडपसरदरम्यान सायकल ट्रॅक आणि पदपथ उभारणीच्या कामाला एक दशकाहून अधिक कालावधी लोटला, तरी अजून काम सुरूच आहे.  अवघा एक किलोमीटरसुद्धा बीआरटी मार्ग पूर्ण दिसून येत नाही.

Worried about the cycle track of Solapur road; Pedestrians also suffer when walking through the footpath | सोलापूर रस्त्यावरील सायकल ट्रॅकची बिकट ‘वाट’; पदपथावरून चालताना पादचारीही त्रस्त 

सोलापूर रस्त्यावरील सायकल ट्रॅकची बिकट ‘वाट’; पदपथावरून चालताना पादचारीही त्रस्त 

googlenewsNext
ठळक मुद्देदहा वर्षांपासून सुरू शहर आणि परिसरात सायकल ट्रॅक उभारणीचे काम सोलापूर आणि सासवड हे मार्ग ओलांडताना चालावे लागते जीव मुठीत धरून

हडपसर  : सोलापूर रस्त्यावर पुलगेट ते हडपसरदरम्यान सायकल ट्रॅक आणि पदपथ उभारणीच्या कामाला एक दशकाहून अधिक कालावधी लोटला, तरी अजून काम सुरूच आहे.  अवघा एक किलोमीटरसुद्धा बीआरटी मार्ग पूर्ण दिसून येत नाही. त्यामुळे सायकल चालवताना आणि पदपथावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. 
बीआरटी मार्गामुळे वाहतुकीचा रस्ता कमी झाल्याने शहर आणि परिसरात सायकल ट्रॅक उभारणीचे काम दहा वर्षांपासून सुरू आहे. त्या वेळी महापौर, आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांनीही ‘सायकल वापरा प्रदूषण टाळा’चा नारा  देत सायकल चालवली होती. महापालिकेनेही प्रायोगिक तत्त्वावर सायकली भाड्याने देण्याचे नियोजन केले होते; परंतु नंतर सायकल ट्रॅकचा बोजवारा उडाला. शहरातील एकही सायकल ट्रॅक व्यवस्थित केलेला नाही. त्यात अनेक अडथळे आहेत. ज्या ठिकाणी सायकल ट्रॅक उभारला गेला आहे, त्याच्यावर अतिक्रमणे झालेली आहेत. ती हटविण्याचे धाडस पालिका प्रशासन करीत नाही, कारण स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्यामध्ये हितसंबंध  गुंतलेले आहेत. पदपथही कुठे शिल्लक दिसत नाहीत. त्यावरही अतिक्रमणे झालेली आहेत. फेरीवाले आणि दुकानदारांसाठीच सायकल ट्रॅक आणि पदपथ उभारले आहेत की काय, अशीच भावना नागरिकांमध्ये आहे. सासवड रस्त्यावर काही वर्षांपूर्वी सायकल ट्रॅक उभारला, त्याच्या उद्घाटनाप्रसंगी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सायकल चालवून या कामाचे कौतुक केले होते. पण आता वाहनांच्या गर्दीत सायकली हरवल्या आहेत. 

सायकलवर विद्यार्थी दिसतो क्वचितच 
दहा-पंधरा वर्षांपूर्वी हडपसर आणि परिसरातील शाळकरी मुले सायकलवरून शाळेत जात होती, त्या वेळी वाहनांची गर्दी कमी होती.  मात्र, शहरीकरणाबरोबर नागरिकरणही झपाट्याने वाढत आहे. उंच-उंच इमारती उभ्या राहत आहेत. शहरवासी उपनगर आणि परिसरात सदनिका घेऊन राहू लागले आहेत. त्यामुळे सोलापूर आणि सासवड हे मार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागते. 

ट्रॅकचा खर्च वाया 
वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, धुरांचे लोट यामुळे श्वसनाचे आणि फुफ्फुसाचे आजार वाढत आहेत. सायकल ट्रॅक बनविण्यासाठी खर्च केलेली रक्कम किती होती आणि किती खर्च केली, याचा लेखाजोखा प्रशासनाने जाहीर करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Worried about the cycle track of Solapur road; Pedestrians also suffer when walking through the footpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे