चिंताजनक ! पुण्यात वाढतोय कोरोना, रुग्णसंख्या पोहोचली १६८३ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 09:14 PM2021-02-15T21:14:48+5:302021-02-15T21:15:37+5:30
शहरात सोमवारी महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १८२७ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ७७१ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत
पुणे - पुण्यात पुन्हा कोरोनाचा आलेख वाढताना दिसतो आहे. शहराचा पॅाझिटिव्हीटी रेट हा आता १०% पर्यंत जाउन पोहोचला आहे. पुण्यात सोमवारी एकूण १९३ नव्या रुग्णांची भर पडली. शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या १६८३ वर पोहोचली असून आज १६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर, २ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मध्ये सोमवारी दिवसभरात १०० जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ६२ जण कोरोनामुक्त झाले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक लाख एक हजार ८६८ झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी होती. मात्र या आठवड्यात त्यात भर पडली असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २०१४ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरात सोमवारी महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १८२७ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ७७१ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. सोमवारी दिवसभरात १९५१ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात २३८४ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. ५९६ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून १९१२ जणांना घरी सोडण्यात आले. तर ७०७ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ११९ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७७६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९८०२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ११६ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
शहरात १३०७ रुग्णांचे गृहविलगीकरण
कोरोना पॉझिटिव्ह असलेले ७०७ सक्रीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर सक्रीय असलेल्या १३०७ रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण २०१४ सक्रीय रुग्ण शहरात आहेत. सोमवारी दिवसभरात २५१ घरांना भेटी देऊन ८७२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.