शेतीव्यवसायाला सर्वाधिक फटका
By admin | Published: January 2, 2017 02:22 AM2017-01-02T02:22:17+5:302017-01-02T02:22:17+5:30
नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही ग्रामीण भागातील स्थिती सुधारली नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेती व्यवसायाला याचा मोठ्या प्रमणात फटका
बारामती : नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही ग्रामीण भागातील स्थिती सुधारली नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेती व्यवसायाला याचा मोठ्या प्रमणात फटका बसला. शेतमालाचे दर कमालीचे घसरले. तर जिल्हा बँकांवरील निर्बंधांमुळे शेती व्यवसायाच्या आर्थिक नाड्याच आवळल्या गेल्या आहेत.
पंतप्रधन नरेंद्र मोदींनी ५० दिवसांनंतर नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत बदल होईल असा विश्वास दिला होता. परंतु नोटाबंदी आणि कॅशलेसच्या धामधुमीत ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. ५० दिवसांनंतरही परिस्थितीत बदल न घडल्याने आता ग्रामीण भागामध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. शेतमाल, दुग्धव्यवसाय, आठवडी बाजार, छोटे-मोठे व्यावसायिक, शेतमजूर आदींना नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
चलनटंचाईमुळे शेतमाल घेण्यासाठी व्यापारी फिरकत नसल्याचे चित्र आजही ग्रामीण परिसरात कायम आहे. तर जे व्यापारी शेतमाल उचलण्यास तयार आहेत, ते दर पाडून शेतमाल खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी नुकसान सोसून शेतमालाची विक्री करीत आहे.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी, शेळगाव, गोतोंडी आदी भागांमध्ये सध्या डाळिंबाच्या बागा सुरू आहेत. नोटाबंदीपूर्वी डाळिंबाच्या १ नंबरच्या गुणवत्तापूर्ण फळांना ९० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर मिळत होता. परंतु तोच दर सध्या ५० ते ६० रुपयांपर्यंत आला आहे. प्रतिकिलो ३० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. यातून उत्पादन खर्च निघत असला तरी पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हातात भांडवल राहात नसल्याने पुढील हंगामात फळबागा कशा जगवायच्या हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. तीच परिस्थिती दुग्धव्यावसायिकांची झाली आहे. दुधाचे पगार मिळत आहे. मात्र पूर्वी रोखीने मिळणारे पगार आता थेट खात्यात जमा होऊ लागले आहेत. मात्र बहुतेक दुग्धव्यावसायिकांची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये आहेत.जिल्हा बँकांवरील निर्बंधांमुळे खात्यावरील पैसे काढण्याची मर्यादा आहेत.
तसेच दूध संस्थांनीही राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच खाती काढण्याचे आवाहन दुग्धव्यावसायिकांना केले आहे. त्यात दुधाचे दरही २२ रुपयांवरून पुढे सरकले नसल्याने जनावरे संभाळणे जिकिरीचे झाले आहे.
शेती व शेतीपूरक व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च, चलनटंचाई, कॅशलेस यंत्रणेबाबत असलेली संभ्रमावस्था यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता जाणकरांमधून व्यक्त होत आहे.
बँकेतील गर्दी काही केल्या कमी होईना...
वाडा : परिसरातील नागरिकांकडून ५०० व १००० हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या देशात शेतकरीवर्ग ७० टक्केच्या जवळपास असून, बाकी ३० टक्के टक्के नागरिकांची आर्थिक बाजू चांगली आहे. काळा पैसा शोधण्यासाठी घेतलेला निर्णय सामान्य जनतेला वेठीस धरण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. नोटाबंदी झाल्यापासून वाडा येथील एटीएम बंद होते. ते आता शनिवारपासून सुरू कण्यात आले आहेत. या परिसरात एकच एटीएम असल्याने बँकेत होणाऱ्या गर्दीला वैतागून एटीएमकडे धाव घ्यावी असे नागरिकांना वाटत होते. पण ते बंद असल्याने नागरिकांना बँकेत ताटकळत थांबावे लागत आहे.
बँक आॅफ महाराष्ट्र शाखेतून जास्त रक्कम काढता येते, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दोन हजार रुपये मिळत आहेत. कधी बँकेकडे कॅश आलीच नाही तर नागरिकांना पैसे मिळत नाहीत. काही नागरिक पैसे आले नाही तर आमचे पासबुक ठेवून घ्या, दुसऱ्या दिवशी तरी पैसे द्या असे म्हणत आहेत. बँक कर्मचारी म्हणतात, की कॅशच आली नाही तर तुमचं पासबुक ठेवून काय करू. ५० दिवसांपासून कामधंदा सोडून केवळ पैशासाठी रांगा लावत आहे. कधी सुटणार हा काळ्या पैशाचा खेळ? असा सवाल नागरिक करत आहेत.