Tanaji Sawant: सर्वसामान्य व्यक्तीसाठी पोलिसांसह अन्य यंत्रणा कामाला लागली असती का? अपहरण नाट्याच्या घडामोडींवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:43 IST2025-02-13T12:41:12+5:302025-02-13T12:43:22+5:30
चार्टर्ड लँड होऊन ऋषिराज बाहेर येईपर्यंत अन्य विमानांचे टेक ऑफ-लँडिंग थांबवले, तसेच पाच तास पोलिसांसह विमानतळ प्रशासनाची धावाधाव झाली

Tanaji Sawant: सर्वसामान्य व्यक्तीसाठी पोलिसांसह अन्य यंत्रणा कामाला लागली असती का? अपहरण नाट्याच्या घडामोडींवर प्रश्नचिन्ह
पुणे : माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत अपहरण नाट्यातील प्रत्येक घडामोडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुळात खरंच सावंत कुटुंबीयांना मुलगा बँकॉकला जाणार आहे, हे माहिती नव्हते? ज्यावेळी ऋषिराज मित्रांसोबत आहे हे तानाजी सावंत पत्रकार परिषदेत सांगतात, त्यावेळी चार्टर्ड परत पुणे विमानतळावर बोलावण्याएवढे हे प्रकरण गंभीर होते का? पोलिसांनीदेखील कोणतीही पडताळणी न करता तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल कसा केला? यासाठी पोलिसांवर वरिष्ठ पातळीवरून दबाव होता का? सावंतांच्या मुलाऐवजी सर्वसामान्य व्यक्तीसोबत असे झाले असते तर पोलिसांसह अन्य यंत्रणा एवढ्याच तत्परतेने कामाला लागली असती का? असे एक ना अनेक प्रश्न या अपहरण नाट्यानंतर उपस्थित होत आहेत.
ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याची फिर्याद देणारे जेएसपीएम शिक्षण संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख राहुल सुभाष करळे (४७, रा. सावंत विहार, मोरे बागेजवळ, कात्रज) यांनी कुणाच्या सांगण्यावरून ही तक्रार दिली. जर ऋषिराज कारमध्ये बसून संस्थेच्या कार्यालयातूनच बाहेर पडले होते तर, तक्रार देताना अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव भारतातून अपहरण केल्याची तक्रार देण्याचे कारण काय? हे प्रश्नदेखील तेवढेच महत्त्वाचे आहेत.
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज यांच्या अपहरणाची गोष्ट सोमवारी (दि. १०) संध्याकाळी चारच्या सुमारास सुरू झाली. अवघ्या पाच तासांत ऋषिराज बँकॉकला जात असताना अंदमानपासून सुखरूप रात्री नऊच्या सुमारास पुण्यात आला. या पाच तासांत यंत्रणेने ज्याप्रमाणे ‘चोख’ काम केले, ते कशामुळे? सावंतांनी मुख्यमंत्री कार्यालयापासून, उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, पोलिस आयुक्त, सहपोलिस आयुक्त या सगळ्यांना फोनाफोनी करून स्वत: पोलिस आयुक्तालयात ठिय्या मांडला होता. मुलगा परत आल्यानंतर तानाजी सावंत यांनी आजपर्यंत त्यावर कोणतेही भाष्य न करता गप्प राहणे पसंत केले आहे. ऋषिराज परत आल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांच्यासह दोन्ही मित्रांचा जबाब नोंदवून घेतले असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.
जबाबात काय?
ऋषिराज आठवड्यापूर्वी व्यावसायिक कामासाठी दुबईला गेले होते. त्यानंतर खासगी विमानाने ते मित्रांसमवेत व्यावसायिक कामासाठी बँकाँकला निघाले होते, असे ऋषिराज यांनी जबाबात नमूद केले आहे, तसेच आठवड्यापूर्वी व्यावसायिक कामासाठी दुबईला जाऊन आल्याने, त्यानंतर लगेचच बँकॉकला खासगी विमानाने व्यावसायिक कामासाठी निघाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यास ते नकार देतील. त्यामुळे कुटुंबीयांना बँकॉक दौऱ्याबाबत माहिती दिली नसल्याचे ऋषिराज यांनी जबाबात म्हटले आहे. ऋषिराज यांनी रविवारी (दि. ९) चार्टर्ड प्लेन विमानाचे ७८ लाख ५० हजार रुपये ‘आरटीजीएस’द्वारे भरले होते. ही रक्कम कशी अदा झाली, याचीही माहिती गुन्हे शाखेकडून घेण्यात येणार आहे.
‘क’ समरी अहवाल सादर करणार
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज याचे अपहरण झाल्याची फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तेव्हा हे प्रकरण अपहरण नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे संबंधित गुन्हा रद्दबातल करण्याची प्रक्रिया (समरी रिपोर्ट) पार पाडली जाऊ शकते. याबाबतचा ‘क’ समरी अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झालेला कथित अपहरण प्रकरणाचा गुन्हा रद्दबातल केला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
प्रशासनावर ताण नेमका कसा..?
- मोबाइलवर संपर्क झाला नसल्याने तत्काळ अपहरणाची तक्रार.
- माजी मंत्र्यांचा मुलगा असल्याने अतिवरिष्ठ पातळीवरून फोनाफोनी.
- साहजिकच पोलिस प्रशासनासह अन्य यंत्रणेवर दबाव.
- विमानतळावरून ऋषिराज नेमके कुठे गेले? कसे गेले? यासाठी संपूर्ण प्रवाशांच्या याद्या तपासण्यात आल्या.
- ज्या मार्गाने ऋषिराज विमानतळावर गेले, विमानतळावरून चार्टर्डमध्ये बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले.
- बँकॉकला जात असलेले चार्टर्ड अंदमान-निकोबारपर्यंत असताना पायलटला परत पुण्याला आणावे लागले.
- चार्टर्ड लँड होऊन ऋषिराज बाहेर येईपर्यंत अन्य विमानांचे टेक ऑफ-लँडिंग थांबवले.
- पाच तास पोलिसांसह विमानतळ प्रशासनाची धावाधाव.