पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्यास ती श्रद्धांजली ठरणार नाही का? राज ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 12:36 PM2023-02-05T12:36:19+5:302023-02-05T12:38:09+5:30

भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा

Wouldnt it be a tribute if the Pimpri Chinchwad and Kasba by elections go unopposed Raj Thackeray question | पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्यास ती श्रद्धांजली ठरणार नाही का? राज ठाकरेंचा सवाल

पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्यास ती श्रद्धांजली ठरणार नाही का? राज ठाकरेंचा सवाल

Next

पुणे : पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक लढण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. परंतु ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यातच भाजपने या दोन्ही जागांसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर चिंचवडमधून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघडी लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मत मांडले आहे.  पिंपरी-चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास तीच श्रद्धांजलीच ठरणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं. तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो. अशा वेळेस  पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही असे त्यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे. 

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा राज ठाकरे यांनी पत्रकातून नमूद केली आहे. 

Web Title: Wouldnt it be a tribute if the Pimpri Chinchwad and Kasba by elections go unopposed Raj Thackeray question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.