व्वा सरपंच व्वा.! कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करून दाखवली माणुसकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 06:48 PM2020-07-31T18:48:55+5:302020-07-31T18:49:21+5:30

आजाराच्या भीतीने नातेवाईकांनी दाखवली असमर्थता

Wow Sarpanch Wow.! Humanity was shown by cremating the corona victims | व्वा सरपंच व्वा.! कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करून दाखवली माणुसकी

व्वा सरपंच व्वा.! कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करून दाखवली माणुसकी

Next
ठळक मुद्देमंचरच्या सरपंचानी घेतला पुढाकार

मंचर : कोरोनामुळे माणुसकी दुरावली आहे. या काळात सख्ख्येसुद्धा मदत करण्यास असमर्थता दाखवत आहेत. याचीच प्रचिती गुरुवारी मंचरकरांना आली. शेजारील तालुक्यातील दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास असमर्थता दर्शविली. मात्र, मंचरचे सरपंच दत्ता गांजळे यांनी माणुसकी जिवंत ठेवत पीपीई किट घालून दोन्ही मृतदेहांवर तपनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.  
     शेजारील तालुक्यातील दोन कोरोना संशयित रुग्णांचा उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या ठिकाणी कार्यरत असणाºया महिला डॉक्टरने ही माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांना दिली. गांजाळे यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांशी चर्चा केली.

दोन्ही रुग्ण कोरोना संशयित असल्यामुळे त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात शासकीय नियमाप्रमाणे देता येत नसल्याने तसेच नातेवाईकांनीही मृतदेह आपल्या गावी नेण्यास असमर्थता दाखवली. यामुळे शेवटी मंचरमधील तपनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. तोपर्यंत एका कुटुंबातील बरेचसे नातेवाईक जमा झाले होते. तर दुसऱ्या कुटुंबातील मयत झालेल्या बाबांचा मुलगा खूप वर्षांपूर्वी मयत झाल्यामुळे त्या बाबांच्या नातेवाईकांमध्ये फक्त त्यांची मुलगी व सून उपजिल्हा रुग्णालयात असल्यामुळे अंत्यसंस्कार कोणी करायचा हा मोठा प्रश्न होता. पहिल्या कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्तीचा मुलगा सोडून इतर नातेवाईकांनी मृतदेहाला हात लावण्यात असमर्थता दाखवल्यामुळे त्या मयत व्यक्तीच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला आधार देण्यास तसेच अंत्यसंस्कारासाठी पुढे येण्यास नातेवाईक तयार झाले नाही. प्रत्येक नातेवाईक आपल्या जीवाला घाबरून जबाबदारी नाकारत होता.

सरपंच गांजाळे यांनी स्वत: अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. उपजिल्हा रुग्णालयात जाऊन दोन्ही कोरोना संशयित रुग्णांचे मृतदेह वॉर्डातून स्वत:  रुग्णवाहिका चालक गौरव बारणे व बजरंग दलाचे अक्षय चिखले यांना सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालयाबाहेर आणले. मंचरच्या तपनेश्वर स्मशानभूमीमध्ये दोन्ही मृतदेह आणल्यानंतर  अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.

पहिल्या मृत व्यक्तीचा मुलगा आणि पत्नी सोडून आणि दुसऱ्या मृत व्यक्तीची मुलगी आणि सून सोडून इतर नातेवाईकांनी स्मशानभूमीच्या बाहेर रस्त्यावर  थांबणेच सुरक्षित समजले. गांजळे यांनी आणि त्यांच्या सहकाºयांनी रक्ताच्या नात्याप्रमाणे व सर्व हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. 
.....
मुलीच्या ‘त्या’ वाक्याने सर्व गहिवरले
अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसºया कुटुंबातील मृत व्यक्तीच्या मुलीने व सूनेने सरपंचांचा निरोप घेताना काढलेले वाक्य खूप महत्त्वाचे आहे. त्या म्हणाल्या ‘आमचे बाबा खरंच भाग्यवान आहेत. आज तुमच्या हातून त्यांना मुखाग्नी मिळाला. त्यांच्या मुलाची जागा तुम्ही आज भरून काढली, रक्ताच्या नात्याप्रमाणे माणुसकीचे नाते तुम्ही निभावले.’’ त्यांच्या या वाक्यामुळे उपस्थित सर्व गहिवरले. 

सरपंच दत्ता गांजाळे यांनी स्वत: दोन्ही कोरोना संशयित रुग्णांच्या चितेला मुखाग्नि दिला. तसेच सर्व नातेवाईकांना रुग्णालयाने त्यांच्या गावी पाठवले. कुणाकडूनही अंत्यविधीचा कुठलाही खर्च घेण्यात आलेला नाही. यामुळे मंचरकरांमध्ये किती माणुसकी जिवंत आहे,याचे दर्शन गुरुवारी झाले.

Web Title: Wow Sarpanch Wow.! Humanity was shown by cremating the corona victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.