गणरायाला वाजतगाजत निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 03:19 AM2018-09-20T03:19:53+5:302018-09-20T03:20:09+5:30
सातव्या दिवशी घाटांवर विसर्जनाला गर्दी : महापालिका कर्मचाऱ्यांची भाविकांना मदत
पुणे : गौरीनंतर सातव्या दिवशी निरोप देण्यात येणाºया गणरायाचे शहरातील विविध घाटांवर वाजगाजत विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत भाविकांनी श्री गणेशाला निरोप दिला. महापालिकेने शहरातील १८ घाटांवर २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केलेली असून नदीपात्र तसेच अन्य ठिकाणीही लोखंडी हौद विसर्जनासाठी उपलब्ध करून
दिलेले आहेत.
विसर्जनाच्या प्रत्येक ठिकाणी महापालिकेने स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले आहेत. घाटांवर तर पथकेच तयार ठेवली आहेत. पाचव्या दिवशी गौरीबरोबरच विसर्जन होणाºया गणपतींची संख्या जास्त असतो. त्यातुलनेत सातव्या दिवशी विसर्जन होणारे गणराय संख्येने कमी असतात. त्यामुळे घाटांवर फारशी गर्दी नव्हती. बहुसंख्य गणपती घरगुती असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य वाजतगाजत दुपारपासूनच घाटावर येत होते.
गणपतीची स्वारी घाटावर विसर्जनासाठी आली, की आरती करण्यासाठी महापालिकेने टेबलांची व्यवस्था करून दिली आहे. नदीपात्रात मूर्ती विसर्जित केल्यास नदीचे पाणी प्रदूषित होते, प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींमुळे नदीचे पाण्यातील झरे बंद होतात; त्यामुळेही पर्यावरणप्रेमी मूर्तीचे नदीत विसर्जन करू नये, असा प्रचार गेली काही वर्षे करीत आहेत. याचा परिणाम दर वर्षी वाढतच चालला असल्याचे दिसते. नदीपात्रात विसर्जन होणाºया मूर्तींची संख्या अजूनही जास्त असली तरीही हौदांमध्ये विसर्जन करण्यासही अनेक कुटुंबे प्राधान्य देतात. वृद्धेश्वर, लकडी पूल, अष्टभूजा, सूर्या हॉस्पिटल, पटवर्धन घाट, आपटे घाट अशा बहुसंख्य घाटांवर हौदांमध्ये मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिसाद मिळत होता, अशी माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे व सुनील मोहिते यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते, असे ते म्हणाले. शहरातील सर्व विसर्जनव्यवस्थेची जबाबदारी असलेले मुकुंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘कुठेही घाई गर्दी करू नये, भाविक काय म्हणतात ते नीट ऐकावे, नदीपात्राकडे लहान मुलांना जाऊ देऊ नये, अशा सूचना कर्मचाºयांना देण्यात आल्या आहेत. हौदातील विसर्जनही नीट करून घ्यावे, त्याकडे लक्ष ठेवावे, असे त्यांना सांगण्यात आलेले आहे.’’
महापालिका आता अखेरच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहे. सर्व घाटांवरील कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्राजवळ जीवरक्षक नियुक्त करण्यात आले आहे. सीसीटीव्हीवर विसर्जनाचे चित्रण होईल. त्यावर लक्ष ठेवण्यास स्वतंत्र कर्मचारी आहेत. स्वच्छता कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली असून रात्रीच्या वेळीही घाटांची त्वरित स्वच्छता करण्यात येत आहे. अखेरच्या दिवसापर्यंत ही सर्व यंत्रणा कार्यरत राहील.
- ज्ञानेश्वर मोळक,
सहआयुक्त, महापालिका